आधी प्रतिष्ठेचे करूनही इंदिरा गांधी यांच्या आधी शरद पवार यांचा विधिमंडळात सन्मान करण्यास संमती देऊन काँग्रेसने राष्ट्रवादीपुढे पुन्हा एकदा नमते घेतले आहे. राष्ट्रवादीने जरा डोळे वटारल्यावर माघार घ्यायची ही काँग्रेसमध्ये जणू काही प्रथाच पडली आहे.

विधिमंडळात इंदिरा गांधी यांचा गौरव आधी करावा, अशी काँग्रेसची मागणी होती. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे, संजय दत्त आदी नेत्यांच्या संयुक्त बैठकीत तसे पत्र देण्याचा निर्णय झाला होता. इंदिरा गांधी या माजी पंतप्रधान आणि भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराच्या मानकरी असल्याने सर्व नेत्यांच्या आधी त्यांचा सन्मान व्हावा ही मागणी रास्त होती. पण राष्ट्रवादीने डोळे वटारले आणि काँग्रेसच्या नेत्यांनी शेपूट घातले. आता शरद पवार यांच्यानंतर इंदिरा गांधी यांच्या कार्याचा गौरव होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते जिंकले हे काही पहिल्यांदा नाही. १९९९ पासून कायम राष्ट्रवादीने काँग्रेसवर कुरघोडी केली आहे.

राष्ट्रवादीपेक्षा २० आमदार जास्त निवडून आल्यावरही गृह खात्यांसह सर्व महत्त्वाची पदे राष्ट्रवादीने कायम ठेवली होती. २००४ मध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसपेक्षा दोन जास्त आमदार निवडून आले होते तेव्हा मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे कायम राहिले होते. पण तेव्हा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची तशी इच्छा नव्हती, असे बोलले जाते. यावरून अजित पवार यांनी नेतृत्वाला दोष दिला होता. केंद्र व राज्यात प्रत्येक वेळी राष्ट्रवादीच्या कलानेच काँग्रेसने घेतले. शरद पवार यांनी बरोबर यावे म्हणून सोनिया गांधी मागे पवारांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने भाजप आणि शिवसेनेची मोट बांधून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

राष्ट्रवादीची दांडगाई प्रत्येक वेळी काँगेसला सहन करावी लागली आहे. आघाडी तुटल्यावरही राष्ट्रवादीची दादागिरी सुरूच आहे.  विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव भाजपच्या मदतीने मंजूर केला होता. तसेच भाजपच्या मदतीने सभापतीपद मिळविले होते. गेल्या वर्षी विधान परिषद निवडणुकीत एक जास्त जागा राष्ट्रवादीने पदरात पाडून घेतली होती. काँग्रेसला अडचणीत आणण्याची एकही संधी राष्ट्रवादीकडून सोडली जात नाही.

राज्यातील काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी किंवा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात भूमिका मांडतात, पण दिल्लीकडून नमते घेण्याच्या सूचना आल्यावर काँग्रेस नेत्यांना मूग गिळून बसावे लागते. काँग्रेसचे वरिष्ठ नेतेच तशा सूचना करीत असल्याने पर्याय नसतो, असे राज्यातील काँग्रेसच्या एका बडय़ा नेत्याने सांगितले.