२९ जिल्ह्य़ांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद; चार जिल्ह्य़ांतील प्रमाण ६० टक्क्यांपेक्षाही कमी

मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या आणि दुष्काळी वर्ष म्हणून गणल्या गेलेल्या सन २०१४ आणि २०१५ या वर्षांतील पावसाशी तुलना करता यंदा मुंबईत आतापर्यंत पडलेल्या पावसाचे प्रमाण कमीच असून, गेल्या सहा वर्षांतील हा नीचांक आहे. उर्वरित राज्याचीही स्थिती चिंताजनक आहे. मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्य़ांत अवघा ६० ते ७० टक्के पाऊस पडला आहे आणि येत्या आठवडय़ातील हवामानाचा अंदाजही दिलासा देणारा नाही. कोकण वगळता राज्याच्या इतर भागांत पावसाच्या केवळ तुरळक सरी पडतील, तसेच विदर्भात बुधवारपासून पावसांच्या सरींमध्ये वाढ होऊ शकेल, असा हवामानशास्त्र विभागाचा अदमास आहे.

राज्यात सन २०१४ आणि त्यानंतर २०१५ अशी सलग दोन वर्षे पावसाने कमालीची ओढ दिली होती. अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज तेव्हा हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता. यंदा महाराष्ट्रासह मध्य भारतात १०० टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र मुसळधार पावसाचे महिने म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांमधील जुलै सरला असून, ऑगस्ट अर्धा सरला आहे. असे असताना गुजरात वगळता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा या राज्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्यात नाशिक, पुणे, पालघर, ठाणे या जिल्ह्यांखेरीज इतरत्र पावसाने दडी मारली आहे. त्यातच गेला आठवडाभर सिंधुदुर्ग व रत्नागिरी वगळता इतरत्र पावसाने हजेरी लावलेली नाही. हीच स्थिती येत्या आठवडय़ात कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

मुंबई उपनगरांमध्ये जून आणि जुलै महिन्यात पावसाने सरासरीएवढी कामगिरी केली होती. मात्र ऑगस्ट अर्धा संपलेला असताना शहर व उपनगरांमध्ये पावसाने शंभरीही गाठलेली नाही.

कोकणापुरताच दिलासा

कोकणातील बहुतांश ठिकाणी येत्या आठवडय़ात पावसाची शक्यता असून मुंबईत पुढील दोन दिवसांत पावसाच्या काही सरी येण्याची शक्यता आहे. विदर्भात १६ ऑगस्टनंतर पावसाचा जोर थोडाफार वाढू शकेल. राज्याच्या इतर भागाला मात्र पावसाची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.