विरोधकांचा आरोप

अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी या कर्जमाफीच्या योजनेचा मोठय़ा प्रमाणावर आत्महत्या होणाऱ्या विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. कारण विदर्भ आणि मराठवाडय़ात शेतकऱ्यांकडे शेतीचे क्षेत्र जास्त असल्याने या योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

अल्पभूधारक म्हणजे दोन हेक्टर्स किंवा पाच एकरापर्यंतच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. विदर्भात शेतकऱ्यांकडील जमिनीचे क्षेत्र जास्त आहे. मराठवाडय़ातही तशीच परिस्थिती आहे. कोकणात एवढी सलग जमीन असणे कठीण जाते. यामुळेच या कर्जमाफीच्या योजनेचा विदर्भ, मराठवाडा, कोकण किंवा काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभ होणार नाही, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेचे सहसचिव डॉ. अशोक ढवळे यांनी व्यक्त केले.

कोरडवाहू शेतकऱ्यांनाही या योजनेचा तेवढा फायदा होणार नाही. केवळ शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा हा प्रकार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. ३१ ऑक्टोबपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. गेली अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केवळ आश्वासने दिली जात आहेत अशी टीका विरोधकांनी केली.