दुबार आणि पूर्ण वेळ शिक्षकांच्या वादामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

रात्रशाळेत दुबार नोकरी करणाऱ्यांना सरकारने कमी केल्यामुळे बुधवारी मुंबईतील अनेक रात्रशाळा या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उघडताच आल्या नाहीत. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी रात्रशाळा बंद होत्या असा आरोप छात्रभारतीने केला आहे. तर दुसरीकडे फक्त रात्रशाळेत असलेल्या शिक्षकांना दुबार नोकरी करणाऱ्या शिक्षकांनी, मुख्याध्यापिकांनी मानसिक त्रास देत रात्रशाळा उघडूच दिल्या नाहीत, असे मत रात्रशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने मांडले आहे. शाळा आणि राज्य सरकार यांच्या या वादामध्ये मात्र दिवसभर कष्ट करून रात्रशाळेत शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र टांगणीला लागलेले आहे.

रात्रशाळेमध्ये गेल्यावर हजेरी पुस्तक सहीसाठी देण्याचे मुख्याध्यापकांनी नाकारले. तसेच जबरदस्तीने शाळेच्या गेटसमोर उभे राहून आमचे फोटो काढले. शासनाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, अशा आशयाच्या पत्रकावर आमच्या सह्य़ा घेतल्या. आम्ही असेपर्यंत तुम्ही कशा रात्रशाळा सुरू करता ते बघतो, अशी धमकीही दिली. त्यामुळे आम्हा शिक्षकांवर मानसिक दडपण आले आहे, असे एकवीरा रात्रशाळेचे पूर्णवेळचे शिक्षक नंदकुमार सातपुते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. विद्यार्थ्यांची दिशाभूल करत छात्रभारती व शिक्षक भारती संघटना रात्रशाळा बंद पाडत आहेत.

फक्त रात्रशाळेत काम करणाऱ्या शिक्षकांवर दडपण आणून शासनाच्या विरोधात बोलण्यासाठी धमकावले जात आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाली आहे. उद्या याबाबत निर्णय घेऊन रात्रशाळा अखंडपणे सुरू राहतील, असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले आहे. तसेच याबाबतची सुनावणी ही उद्या न्यायालयामध्ये आहे, अशी माहिती रात्रशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या दर्शना पांडव यांनी दिली आहे.

मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निषेध

रात्रशाळेच्या पहिल्याच दिवशी दुबार नोकरी करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेबाहेर शासनाचा निषेध करत शासन निर्णय मागे घेण्याची मागणी केली. तर शासनाच्या निर्णयाविरोधात छात्रभारती संघटनेने मंत्रालयावर बुधवारी धडक मोर्चा नेला होता. या मोर्चातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. रात्रशाळा बंद पाडण्याचा शासनाचा डाव आहे, असा आरोप छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दुसरीकडे फक्त रात्रशाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना दुबार नोकरी करणाऱ्या शिक्षक व कर्मचारी वर्गाने शाळा सुरू करण्यास अडथळा आणला आहे.

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन त्यांची नेमणूक रात्रशाळांवर करण्यात आली आहे. आज हे शिक्षक रात्रशाळांवर हजेरी लावण्यासाठी गेले असता दुबार नोकरी करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने त्यांना शाळेबाहेरच थोपवून ठेवले. त्यामुळे नाईलाजाने या शिक्षकांना रात्रशाळा न भरवताच परतावे लागले.  बी. बी. चव्हाण, शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग