परळ स्थानकात नवीन पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात

मध्य रेल्वेच्या परळ स्थानकातील रेल्वेकडून उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रविवारी या पुलावर नऊ गर्डर टाकण्याचे काम नियोजित वेळेआधीच म्हणजेच सहा तासांतच पूर्ण करण्यात आले. या कामासाठी आठ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. ब्लॉकदरम्यान लोकल फेऱ्या रद्द करतानाच अपला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा ठाण्यापर्यंत चालविण्यात आल्या.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर लष्कराकडून परळ आणि एल्फिन्स्टन रोड स्थानकाला जोडणारा पूल उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर रेल्वेकडूनही मधल्या जागेत आणखी एक नवीन पूल बनविण्याचे काम हाती घेतले आहे. हा पूल महिन्याभरात प्रवाशांसाठी सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी पुलाच्या कामांना गती दिली जात आहे. ४ फेब्रुवारी रोजीही याच स्थानकातील लष्कराकडून उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या कामांसाठी आठ तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा रविवारी आठ तासांचा ब्लॉक घेऊन परळ स्थानकातील पुलावर नऊ गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. सकाळी ८.३० वाजता या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी माटुंगा ते भायखळादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या जलद लोकल धिम्या मार्गावर, तर काही लांब पल्ल्याच्या गाडय़ा ठाणे स्थानकापर्यंतच चालविण्यात आल्या.

परळ स्थानकातील पुलावर गर्डर टाकणे आणि अन्य तांत्रिक काम करण्यासाठी १२५ कामगारांचा हातभार लागला. तसेच २५० टनाच्या दोन क्रेन आणि एक-दोन २५ टनाच्या क्रेनही सोबतीला होत्या. पुलावर गर्डर टाकण्याचे काम प्रत्यक्षात दुपारी अडीच वाजताच पूर्ण झाले. त्यानंतर दुपारी ३.२३ वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी आणि तेथून सुटणाऱ्या जलद लोकल गाडय़ा पूर्ववत करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

डॉकयार्ड रोड स्थानकाच्या पादचारी पुलाखाली आग

हार्बर रेल्वेमार्गावरील डॉकयार्ड रोड स्थानकातील पादचारी पुलाखाली रविवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्यामुळे या मार्गावरील सेवा काही काळ बंद ठेवण्यात आली होती. पुलाखाली असलेल्या कचऱ्याने पेट घेतल्यामुळे ही आग लागली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या उपनगरी गाडीच्या मोटरमनने ही आग पाहिल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना त्याची वर्दी दिली. आग भडकत असल्यामुळे अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.