संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या मुद्रांक घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त रणजित शर्मा यांना तुरुंगाची हवा खावी लागली. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक झालेल्या शर्मा यांची पुढे न्यायालयाने निर्दोष सुटका केली. पण तेलगीच्या निमित्ताने आयपीएस लॉबीतील हेवेदावे मोठय़ा प्रमाणात त्यावेळी दिसून आले. फक्त शर्माच नव्हे तर गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त श्रीधर वगळ व उपायुक्त प्रदीप सावंत यांच्यासह डझनभर अधिकाऱ्यांना तुरुंगात धाडून विशेष पथकाने तेलगी प्रकरणाची दहशतच मुंबई पोलीस दलात पसरविली. या सर्वच अधिकाऱ्यांना न्यायालयाने निर्दोष सोडले आणि ते पोलीस दलात पुन्हा रुजूही झाले. परंतु तेलगी प्रकरणामुळे त्यांच्या कारकीर्दीला कायमचा डाग लागला.

तेलगीला तपासासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात आले तेव्हा त्याला त्याच्या कफ परेड येथील फ्लॅटवर नेण्यात आले. तत्कालीन सहायक निरीक्षक दिलीप कामत यांनी तेलगीची चांगलीच बडदास्त ठेवल्याचे अचानक आलेल्या बंगळूरु येथील विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांना आढळले आणि तेलगीला साहाय्य करणारे मुंबई पोलीस दलातील एकएक अधिकारी गजाआड होऊ लागले. अन्य राज्यातील पोलीस अधिकारी तसेच इतरांवरही कारवाई होत होती. परंतु मोठय़ा प्रमाणात पोलीस अधिकारी अटक होण्याचा प्रकार फक्त महाराष्ट्रात घडला. तेलगीला ताडदेवच्या टोपाझ या डान्सबारमध्ये नेण्याची करामतही मुंबई पोलिसांनी केली. तेलगीने एका बार डान्सरवर दोन कोटींची उधळण केली. तेलगीची खास बडदास्त ठेवत या अधिकाऱ्यांनी त्याला गोवा, हैदराबाद येथे सफरही घडविली. याचा फटका अर्थात तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना बसला आणि तेलगी प्रकरणाने मुंबई पोलीस दल ढवळून निघाले. तेव्हा अटक झालेले अनेक अधिकारी आता पोलीस दलात नाहीत. यापैकी काही निवृत्त झाले आहेत. प्रदीप सावंत आजही सेवेत आहेत. ओमिशन-कमिशनच्या ठपक्यातून हे सर्व अधिकारी सहिसलामत सुटले आहेत.

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस
taiwan earthquake
तैवानमध्ये भूकंपात बेपत्ता लोकांची शोधमोहीम अद्याप सुरू

पुण्याचे पोलीस आयुक्त असताना रणजित शर्मा यांनी तेलगीवर कारवाई करण्यात ढिसाळपणा दाखविला असा ठपका ठेवत शर्मा यांना पहिल्यांदा अटक झाली. ३० नोव्हेंबर २००३ मध्ये ज्या दिवशी शर्मा सेवानिवृत्त झाले त्याचवेळी त्यांना अटक करून विशेष पथकाने खळबळ माजवून दिली होती. कुठल्याही गुन्ह्य़ात मुंबईच्या माजी पोलीस आयुक्ताला अटक होण्याची पहिलीच वेळ होती. आयपीएस लॉबीतील हेवेदाव्यांची झालर या कारवाईला असली तरी केवळ शर्माच नव्हे तर गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन सहआयुक्त श्रीधर वगळ, उपायुक्त प्रदीप सावंत यांच्यासह डझनभर अधिकाऱ्यांपर्यंत विशेष पथकाने कारवाईचे जाळे पसरविले. माजी पोलीस महासंचालक एस. एस. पुरी, उपमहानिरीक्षक सुबोध जैस्वाल, नवी मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे या पथकात होते. नोव्हेंबर २००२ ते जानेवारी २००३ अशी तेलगीची तब्बल ८५ दिवसांची कोठडी मुंबई पोलिसांतील या अधिकाऱ्यांना भारी पडली. न्यायालयाने निर्दोष सोडले तरी त्यांची कारकीर्द डागाळली ती कायमची..

बनावट मुद्रांक खटल्याची सुनावणी सुरूच राहणार

पुणे : कोटय़वधी रुपयांच्या बनावट मुद्रांक प्रकरणी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात दाखल असलेल्या खटल्याचे कामकाज बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याच्या मृत्यूनंतरही सुरू राहणार आहे. अद्याप या खटल्याचा अंतिम निकाल लागला नसून गेली चौदा वर्ष या खटल्याचे कामकाज विशेष न्यायालयात सुरू आहे. अब्दुल करीम तेलगीविरुद्ध बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा दाखल होता. कर्नाटक पोलिसांकडून या प्रकरणात तेलगीला अटक करण्यात आल्यानंतर त्याला पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात कर्नाटक पोलिसांकडून हजर करण्यात आले होते. बनावट मुद्रांक प्रकरणात तेलगीसह एकूण ६७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तब्बल ३९ ठिकाणी गुन्हे

जून २००३ मध्ये बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी भिवंडीतून २२०० कोटी रुपयांचे, कफ परेड येथून ८०० कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक जप्त केले होते. त्यानंतर देशांत त्याच्याविरुद्ध ३९ ठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले होते.

भुजबळांचे पद गेले

मुंबई : अब्दुल करीम तेलगीच्या बनावट मुद्रांक घोटाळ्यात शरद पवार, विलासराव देशमुख या बडय़ा नेत्यांची नावे जोडली गेली तर छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेत्यांना या घोटाळ्यात तुरुंगाची हवा खावी लागली.

या घोटाळ्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची नावे पुढे आली होती.  या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या विशेष चौकशी पथकाने भुजबळांच्या भोवताली फास आवळला होता, पण नवी दिल्लीतून सूत्रे हलल्याने भुजबळ तेव्हा बचावले. पण पुढे एका दशकानंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ तुरुंगात गेले.

तेलगी घोटाळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचेही नाव जोडले गेले होते. तेलगीला मुद्रांक शुल्क विक्रीचा परवाना विलासरावांनी महसूलमंत्री असताना दिला होता. अनिल गोटे यांच्या शिफारसीवरून आपण तेलगीला तेव्हा परवाना दिल्याचा दावा विलासरावांनी केला होता. चौकशी पथकाने विलासराव देशमुख यांची चौकशी केली होती. तेलगी घोटाळ्यात सध्या भाजपचे आमदार असलेल्या अनिल गोटे यांना ‘मोक्का’न्वये अटक झाली होती. चार वर्षांच्या तुरुंगवासानंतर गोटे यांना जामीन झाला होता.

नार्को टेस्टमध्ये कोणाकोणाला पैसे दिले वा मदत केली, असा प्रश्न विचारण्यात आला असता तेलगीने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात बरीच खळबळ माजली होती. अर्थात राष्ट्रवादीने या आरोपाचा इन्कार केला होता. पण तेलगीने पवारांचे नाव घेतल्यावर तपास मंदावला होता, अशी तेव्हा चर्चाही झाली होती.

तेलुगू देशमचे तत्कालीन आमदार चेन्ना बोयन्ना कृष्णा यादव, कर्नाटकचे मंत्री रोशन बेग यांचे बंधू रेहान यांना बनावट मुद्रांक घोटाळ्यात अटक झाली होती. रोशन बेग यांचेही नाव या घोटाळ्यात घेण्यात आले होते. त्यातून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.