‘मराठी’च्या मुद्दय़ावर संघर्ष करीत विस्तारलेल्या शिवसेनेने महापालिका निवडणुकीत अमराठी भाषिक मतांसाठी ‘मराठी कार्ड’ वापरलेच नाही. पण त्यामुळे अमराठी मते शिवसेनेकडे फारशी वळली नाहीत व सर्व मराठी मतेही मिळाली नाहीत. त्यामुळे आता शिवसेनेकडून परप्रांतीयांवर आगपाखड करण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेत अमराठी भाषिक मोठय़ा प्रमाणावर निवडून येणे, ही मराठी माणसासाठी धोक्याची घंटा असल्याचे मत व्यक्त करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता शिवसेना ‘मराठी तितुका मेळवावा,’ याकडेच वळण्याचे संकेत दिले आहेत.

हिंदूुत्वाच्या मुद्दय़ावर भाजपशी झालेली युती तुटल्यावर महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेनेने या वेळी ‘मराठी कार्ड’ खेळले नाही.

भाजप नेत्यांनी अनेकदा डिवचण्याचा प्रयत्न करूनही शिवसेना नेते शांत राहिले. उत्तर भारतीय, गुजराती व अन्य अमराठी भाषिकांना शिवसेनेकडे वळविण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी ‘डिड यू नो’ची इंग्रजीतून प्रचारमोहीमही राबविली गेली. पण बरेच प्रयत्न करूनही अमराठी भाषिकांची मते शिवसेनेला फारशी मिळालीच नाहीत.

मराठी अस्मिता न जागविल्याने मराठी मते भाजप व मनसेकडेही वळली. त्याचा फटका शिवसेनेला बसला . त्यामुळे खासदार राऊत यांनी आता अमराठी भाषिकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.