‘मराठी बाणा’च्या ‘नामहक्का’चा वाद :

मुंबई : ‘मराठी बाणा’ या शब्दाच्या ‘नामहक्का’वरून ‘चौरंग’, अशोक हांडे यांचा ‘शेमारू’ कंपनीशी सुरू असलेल्या वादात उच्च न्यायालयाने मंगळवारी ‘चौरंग’ आणि हांडेना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. अंतरिम दिलासा देण्याबाबतचा तपशीलवार आदेश नंतर देणार असल्याचे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. या आदेशामुळे ‘शेमारू’ची ‘मराठा बाणा’ वाहिनी सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘मराठी बाणा’चा ‘ट्रेड मार्क’ (नामहक्क) आणि ‘ट्रेड नेम’ म्हणून नोंदणी असतानाही ‘शेमारू’ कंपनीने याच नावाने वाहिनी सुरू केली आहे. परंतु स्वत:च्या फायद्यासाठी दुसऱ्याचा ‘ट्रेडमार्क’ वापरणे हा कायद्यानुसार गुन्हा असल्याचा आरोप करत ‘चौरंग’, ‘मराठी बाणा’चे सादरकर्ते अशोक हांडे तसेच सुजय हांडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हांडे यांनी कंपनीविरोधात माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांतर्फे काहीच कारवाई करण्यात आली नाही. परिणामी न्यायालयात यावे लागले, असे युक्तिवादाच्या वेळी ‘चौरंग’ आणि हांडे यांच्यावतीने अ‍ॅड्. राजेंद्र पै यांनी न्यायालयाला सांगितले.

‘मराठी बाणा’ हा शब्द प्रचलित असून त्यातून मराठी भाषेचे, तिच्या अस्मितेचं दर्शन होते. १९व्या शतकापासून मराठी बाणा या शब्दाचा वापर होत असून अनेक ऐतिहासिक पुस्तके, पुस्तके, कादंबऱ्यांमध्येही या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे.

वृत्तपत्र, समाजमाध्यमे, दूरचित्रवाहिन्या, वृत्तवाहिन्या, त्यावरील कार्यक्रमांमध्ये ‘मराठी बाणा’ या नावाचा वापर केला जातो. अगदी हॉटेल्सनासुद्धा हे नाव दिले जाते. त्यामुळे ‘मराठी बाणा‘ या शब्दावर कुणीही मक्तेदारी सांगू शकत नाही, असा युक्तिवाद ‘शेमारू’तर्फे अ‍ॅड्. हिरेन कमुद यांनी केली.