‘मराठी बाणा’च्या ‘नामहक्का’चा वाद

मुंबई : ‘मराठी बाणा’ या शब्दाच्या ‘नामहक्का’वरून ‘चौरंग’, अशोक हांडे यांचा ‘शेमारू’ कंपनीसोबत सुरू असलेला वाद उच्च न्यायालयात आहे. अंतरिम दिलासा कुणाला मिळणार याचा निर्णय न्यायालय मंगळवारी देणार आहे.

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या आणि घराघरात पोहोचलेल्या ‘मराठी बाणा’चा ‘ट्रेड मार्क’ (नामहक्क) आणि ‘ट्रेड नेम’ म्हणून नोंदणी असतानाही ‘शेमारू’ कंपनीने याच नावाने वाहिनी सुरू केली आहे. परंतु स्वत:च्या फायद्यासाठी दुसऱ्याचा ‘ट्रेडमार्क’ वापरणे हा कायद्यानुसार गुन्हा असल्याचा आरोप करत ‘चौरंग’, ‘मराठी बाणा’चे सादरकर्ते अशोक हांडे तसेच सुजय हांडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावाला यांच्यासमोर ‘चौरंग’ आणि हांडे यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी ‘ट्रेड मार्क’ कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हांडे यांनी कंपनीविरोधात माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र कारवाई करण्यात आली नाही. परिणामी न्यायालयात यावे लागले, असे ‘चौरंग’ आणि हांडे यांच्यावतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड्. राजेंद्र पै यांनी न्यायालयाला सांगितले.

‘मराठी बाणा’ हा शब्द प्रचलित असून त्यातून मराठी भाषेचे, तिच्या अस्मितेचं दर्शन होते. १९व्या शतकापासून मराठी बाणा या शब्दाचा वापर होत असून अनेक ऐतिहासिक पुस्तके, शालेय पुस्तके, कादंबऱ्यांमध्येही या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे. वृत्तपत्र, समाजमाध्यमे, दूरचित्रवाहिन्या, वृत्तवाहिन्या, त्यावरील कार्यक्रमांमध्ये ‘मराठी बाणा’ या नावाचा सर्रास वापर केला जातो. अगदी हॉटेल्सनासुद्धा हे नाव दिले जाते. त्यामुळे ‘मराठी बाणा‘ या शब्दावर कुणीही मक्तेदारी सांगू शकत नाही, असा युक्तिवाद ‘शेमारू’तर्फे करण्यात आला.