राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या मकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगण’ या चित्रपटासह ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’, ‘दगडी चाळ’, ‘डबलसीट’, ‘बायोस्कोप’, ‘रंगा पतंगा’, ‘हलाल’, ‘दी सायलेन्स’ आणि ‘हायवे’ असे दहा चित्रपट या वर्षी राज्य चित्रपट पुरस्कारांच्या स्पर्धेत आहेत. ५३ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसाठीची नामांकने सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी जाहीर केली. दर वर्षी ३० एप्रिलला होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या वर्षी राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पहिल्यांदाच उपनगरात घेण्यात येणार असल्याची माहितीही तावडे यांनी या वेळी दिली.
राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी दर वर्षी १० चित्रपटांची, वैयक्तिक पुरस्कारांसाठीची ३ नामांकने आणि तांत्रिक पुरस्कारांची घोषणा केली जाते. या वर्षी या पुरस्कारांसाठी ७३ चित्रपटांच्या प्रवेशिका होत्या. त्यातून अंतिम दहा चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यातून पहिले तीन सवरेत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट आणि उत्कृष्ट ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट असे पुरस्कार दिले जातात. सवरेत्कृष्ट कथा, उत्कृष्ट पटकथा, उत्कृष्ट संवाद या पुरस्कारांसाठी प्रामुख्याने ‘रिंगण’, ‘हलाल’, ‘डबलसीट’, ‘हायवे’ आणि ‘नटसम्राट’ या चित्रपटांमध्ये चुरस आहे.
उत्कृष्ट अभिनेता म्हणून सचिन पिळगावकर (कटय़ार काळजात घुसली), अंकुश चौधरी (डबलसीट) आणि शशांक शेंडे (रिंगण) यांना नामांकने जाहीर झाली. तर उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी मुक्ता बर्वे (डबलसीट), स्मिता तांबे (परतु), मृण्मयी देशपांडे (अनुराग) यांना नामांक ने जाहीर झाली आहेत.