निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार; महेश मांजरेकर यांचे नाव आघाडीवर

मराठी चित्रपटसृष्टीची शिखर संघटना असलेल्या ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’ची पंचवार्षकि निवडणूक लवकरच होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून महामंडळाचा कारभार आणि आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या ‘उद्योगां’विषयी प्रसार माध्यमातून चर्चा, वाद सुरू आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. चित्रपट महामंडळाचा गेल्या काही वर्षांतील कारभार पाहता महामंडळाची ही निवडणूक म्हणजे पंचवार्षकि ‘आखाडा’ ठरणार आहे.

या वेळच्या निवडणुकीत काही दिग्गज मंडळी उभी राहणार असल्याची चर्चा आहे. निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे नाव त्यात आघाडीवर आहे. मांजरेकर निवडून आले तर साहजिकच ते अध्यक्षपदाचे एक प्रबळ दावेदार असणार आहेत. त्यामुळे यंदा ही निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची होणार आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी सहा जणांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत जागृती, समर्थ, श्री महालक्ष्मी या तीन पॅनेलचे सदस्य निवडणुकीच्या िरगणात होते. चित्रपट निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक आणि चित्रपटाशी संबंधित अशी जवळपास २ हजारांहून अधिक मंडळी चित्रपट महामंडळाचे सदस्य आहेत. चित्रपट व्यवसायाशी निगडित विविध १४ विभागांसाठीच्या प्रतिनिधींची निवड करण्यासाठी ही पंचवार्षकि निवडणूक होत असते.

गेल्या कार्यकाळात विजय कोंडके, प्रसाद सुर्वे आणि आता विजय पाटकर यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात अध्यक्ष आणि महामंडळाच्या एकूणच कारभाराविषयी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. दावे व प्रतिदावे केले गेले. महामंडळाच्या बठकीत हाणामाऱ्या, हमरीतुमरीवर येण्याचे प्रकारही घडले.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि मंडळाची मुंबई कृती समिती यांच्यातील वादाचे पडसादही काही महिन्यांपूर्वी उमटले.

मुंबई कृती समितीतील सदस्यांनी चित्रपट महामंडळाच्या प्रभादेवी येथील कार्यालयात जाऊन मुंबई विभागीय समितीचा फलक लावला.

अपवाद वगळता चित्रपटसृष्टीशी संबंधित समस्या सोडविण्यापेक्षा परस्परांमधील मतभेद आणि त्यातून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांनीच महामंडळ चच्रेत आहे. विद्यमान संचालक मंडळातील वादविवादांमुळे गेल्या निवडणुकीमध्ये जी पॅनेल्स व मंडळी होती त्यांच्यातही यंदा मोठी फाटाफूट होण्याची शक्यता आहे. काही नवी समीकरणे तयार करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.