मुंबईतील प्रत्येक उपहारगृहात मराठी खाद्यपदार्थ मिळायलाच पाहिजेत, असे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुंबईतील उपहारगृहाच्या मालकांना ठणकावून सांगितले आहे. येत्या १५ दिवसांत आपली ही मागणी पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही आठवले यांनी दिला आहे. त्यामुळे आता राजकारणात शिवसेना, मनसे यांच्यापाठोपाठ मराठीच्या मुद्द्याला हात घालणारा आणखी एक पक्ष उदयाला आला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
रामदास आठवले यांनी शनिवारी दादर येथील जिप्सी उपहारगृहात मराठी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. दादर भागात मोठ्याप्रमाणावर मराठी लोक राहत असून त्यांच्यासाठी येथील सर्व उपहारगृहांमध्ये मराठी खाद्यपदार्थ मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ दादरपुरताच नाहीतर मुंबईतील सर्व उपहारगृहाच्या मालकांनी आपापल्या उपहारगृहात मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले पाहिजेत. आम्हाला या माध्यमातून कोणावरही बळजबरी करायची नाही. मात्र, मराठी किंवा अन्य भाषिक लोकांना मराठी खाद्यपदार्थ खावावेसे वाटल्यास त्यांना उपहारगृहांमध्ये ते मिळायला हवेत, असे आठवले यांनी म्हटले. आंदोलने झाल्यानंतर थोड्या दिवसांसाठी उपहारगृहांत मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र, काही दिवसांनी उपहारगृहांचे पुन्हा ‘जैसे थे’ सुरू होते, ही परिस्थिती निदर्शनास आणून देताना आठवले यांनी उपहारगृहाच्या मालकांना हा इशारा गंभीरपणे घेण्यास सांगितले.