युनिकोड फॉण्टला ‘स्पेल चेकर’ची जोड; प्रकल्पावर काम सुरू, लवकरच प्रयोगाची अंमलबजावणी

आधुनिक यंत्रणेच्या मदतीने इंग्रजीत लिखाण करताना अशुद्ध शब्दाखाली लाल रंगाची रेघ ओढणारे ‘स्पेल चेकर’ आता लवकरच मराठी भाषेसाठी ‘युनिकोड फॉण्ट’लाही उपलब्ध होणार आहे. राज्याच्या ‘राज्य मराठी विकास संस्थे’नेच या ‘मराठी स्पेल चेकर’ तयार करण्याकरिता पुढाकार घेतला असून, त्यामुळे येत्या काळात मराठी भाषेतील शुद्घलेखनातील चुकांना कायमचा पूर्णविराम लागणार आहे.

या उपक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मंजुरी दिली असून, या प्रकल्पावर काम सुरू झाल्याचे संस्थेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येतील. यात सध्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या युनिकोड फॉण्टमध्ये (मुद्रणाकरिता तयार केलेल्या विशिष्ट वळणाच्या अक्षरांचे संच) स्पेल चेकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे एका क्लिकवर वाक्यातील चुकीचा शब्द ओळखता येईल, अशी माहिती या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेतील शुद्धलेखनाच्या नियमांकडे प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याने ऱ्हस्व-दीर्घ, अनुस्वार, सामान्यरूप, अनेक वचन, जोडाक्षरे, विसर्ग, रफार, विरामचिन्हे ही वाक्यात चुकीच्या पद्धतीने वापरली जातात. त्यामुळे वाक्ये कधीकधी द्वयर्थी किंवा विरुद्धार्थी तयार होतात. मुद्रणात या चुका कायम राहतात. छापील मजकुराचे जतन केले जात असल्याने भविष्यातही चुका होऊ शकतात. त्यामुळेच हा प्रयोग केला जाणार आहे.

१९६० साली मराठी भाषकांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी साहित्य महामंडळाने मराठी शुद्धलेखनाविषयी चौदा नियम तयार केले.

या नियमांना राज्य सरकारतर्फे मान्यता देण्यात आली. त्यानंतर १९७२ साली मराठी शुद्धलेखनाविषयी आणखी चार नवीन नियमांची भर घालून आधीच्या नियमांतील दोष काढण्यात आले. त्यानुसार सर्व क्षेत्रांत या नियमाचे पालन करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. त्यानुसार मराठीची अविरत सेवा करणाऱ्या तज्ज्ञांनी हे नियम कोशाच्या रूपाने सोपे करून सांगितले. अशाच तज्ज्ञांच्या मदतीने या प्रकल्पावर काम केले जाणार आहे.

  • स्पेल चेकरमध्ये माऊसवरील उजव्या बटनावर एक क्लिक करून वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखता येईल.
  • शब्दकोशातील नियम शोधण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत

मराठी भाषेत ‘स्पेल चेकर’ची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निविदा काढण्यात येतील. आणि काही माहिन्यांतच मराठीत ‘स्पेल चेकर’ प्रत्यक्षात उपलब्ध होईल.

– विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री