लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणावरून मराठा समाजातील संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या असून गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर ‘रास्ता रोको’ केला.

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र अकरावी प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातून प्रवेश देण्यात येणार असल्याने मराठा समाजातील संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चेंबूर येथील शीव-पनवेल महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर रास्ता रोको करत जोरदार आंदोलन केले.

या वेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ धक्काबुक्कीदेखील झाली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर रस्त्याच्या बाजूला बराच वेळ आंदोलन सुरू होते. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अशोक चव्हाण यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळी कार्यकर्त्यांनी सरकारला दिला आहे.