मराठी भाषा दिनी विधिमंडळात ठराव

मुंबई : मराठी भाषा विषय सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये अनिवार्य करण्याच्या मराठीप्रेमींच्या मागणीचे यश आता काहीच पावले दूर असल्याचे सध्या तरी भासत आहे. याबाबतचा ठराव येत्या मराठी भाषा दिनी विधीमंडळात मंजूर करणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी केली.

‘मराठी भाषा सर्व अमराठी शाळांमध्ये शिकवली जावी असे राज्य शासनाचे पूर्वीपासूनचे मत आहे. मात्र ते फक्त मत होते, तसा कायदा नव्हता. यापुढे सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी अनिवार्यपणे शिकवली जाईल. त्यासंबंधीचा ठराव २७ फेब्रुवारीला विधीमंडळात मंजूर करून घेतला जाईल’, असे आश्वासन सुभाष देसाई यांनी दिले. केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांचा सध्या प्रचलित असलेला मराठी भाषेचा अभ्यासक्रम सोप्प्या स्तरावरचा आहे. तसेच या मंडळांमध्ये सढळ हस्ते गुणदानाची पद्धत आहे. त्यामुळे मराठी विषय अनिवार्य केला तरी त्याचा दर्जा राखला जाईल की नाही याबाबत साशंकता आहे. यावर उत्तर देताना सुभाष देसाई यांनी ‘राज्य शासनाच्या तज्ज्ञ समितीने तयार केलेली मराठी भाषा विषयाची क्रमिक पुस्तकेच सर्व शिक्षण मंडळांच्या शाळेत लागू होतील’, असे सांगितले.

रंगभवन ही वास्तू फक्त ५० ते ६० वर्षे जुनी आहे. इतक्या कमी वयाची वास्तू ऐतिहासिक वारसा कशी असू शकते ? असा प्रश्न उपस्थित करत देसाई यांनी रंगभवन वास्तूवरील वारसा वास्तूचा शिक्का हटवणार असल्याचे सांगितले. शिवाय मराठी भाषा भवन बंदिस्त स्वरूपात होणार असल्याने तिथे ध्वनिप्रदूषणाचाही प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे मराठी भाषा भवन रंगभवन येथेच होईल, असे देसाई यांनी जाहीर केले. आपल्या हातात येणाऱ्या नस्तीवर मराठीतून शेरा नसेल तर ती स्वीकारली जाणार नाही असे देसाई यांनी जाहीर केले आहे. त्याचा पुनरूच्चार करत त्यांनी मंत्रालयाच्या बाहेरील इतर महामंडळांमधील मराठीच्या वापराबाबत पाहणी केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच ‘मराठी भाषा अधिनियमा’च्या अंमलबजावणीसाठी कठोर पावले उचलणार असल्याचेही सांगितले.