सर्व कार्यालयांना राज्य शासनाचे आदेश
आतापर्यंत केवळ राज्य शासनाची विविध कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत साजरा होणारा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यंदा राज्यातील केंद्र शासनाची सर्व कार्यालये, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम येथेही साजरा होणार आहे. राज्यात दरवर्षी १ ते १५ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो.
राज्य शासनाने एका आदेशान्वये केंद्र शासनाची राज्यातील कार्यालये, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व राष्ट्रीयकृत बॅंका येथेही यंदा हा पंधरवडा साजरा केला जावा आणि त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जावे, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या संदर्भात राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने एक परिपत्रक काढून संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
शाळा-महाविद्यालयांनी विविध परिसंवाद, व्याख्याने, स्पर्धा, कार्यशाळा आणि शिबिरांचे आयोजन करावे, ग्रंथ प्रदर्शन, कथाकथन, काव्य वाचन तसेच अमराठी लोकांना मराठी भाषेचा परिचय करून देण्यासाठी कार्यशाळा व स्पर्धा आयोजित कराव्यात, त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे, सार्वजनिक उपक्रम यांनी मराठीचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे या कार्यालयांनीही पंधरवडय़ात विविध कार्यक्रम आयोजित करावे, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीयकृत बॅंका, खासगी बॅंका, व्यापारी बॅंका यांनीही मराठी भाषेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आपापल्या कार्यालयात तसेच संकेतस्थळावर संदेश प्रसारित करावे, असे आवाहन मराठी भाषा विभागाने केले आहे.