मराठी अभ्यास केंद्र आयोजित ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ १४ व १५ डिसेंबरला परळच्या आर. एम. भट हायस्कूल येथे होणार आहे. संमेलनाच्या आधी सकाळी ८ वाजता ‘मराठी शाळा जागर फेरी’ काढली जाईल. याचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागराज मंजुळे, खासदार अरविंद सावंत, चिन्मयी सुमीत, डॉ. एम. एस. गोसावी उपस्थित राहणार आहेत.

‘मी माझ्या पाल्याला मराठी शाळेत का घातले?’, ‘मराठी शाळांचे वैभव प्रस्थापित करण्यासाठी काय करता येईल?’, ‘मराठी शाळा का टिकवायच्या आणि कशा?’ या विषयांवर पालक, शिक्षक आणि खुल्या गटासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मराठी शाळांसाठी आम्ही काय करणार आहोत?’ या चर्चासत्रात शिवसेना आमदार अजय चौधरी, राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक,काँग्रेसचे आमदार वर्षां गायकवाड, भाजपचे आमदार आशीष शेलार सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सोनिया सांची, श्रुती आवटे, मानसी कदम, अनिकेत सुळे, मनोज देशमुख, हर्षल भोसले हे मराठी शाळेचे यशवंत माजी विद्यार्थी संवाद साधणार आहेत.

‘मातृभाषेतील शिक्षण आणि बाबा म्हणून माझी भूमिका’ या चर्चासत्रात माधव पंडित, किरण भिडे, दिलीप पाचांगणे, चंदन तहसीलदार हे मराठी शाळांचे पालक सहभागी होणार आहेत. मराठी शाळांबाबत कोणाचे काय चुकले?’ या विषयावर विचारमंथन करण्यासाठी संजीवनी रायकर, विनायक पात्रुडकर, नारायण कापोलकर हजर राहणार आहेत. ‘होय! आम्ही मुलांना मराठी शाळेत घातले’ या सत्रात चिन्मयी सुर्वे-सुमीत राघवन, श्रुती तांबे-गणेश विसपुते आपले अनुभव कथन करतील. राज्यभरातील प्रयोगशील मराठी शाळांच्या विविध उपक्रमांचे प्रदर्शन संमेलनादरम्यान आयोजित करण्यात आले आहे. विविध शैक्षणिक आणि शालाबह्य विषयांवरील पुस्तके  एकाच ठिकाणी भरघोस सवलतीत मिळणारे ग्रंथप्रदर्शनही या संमनेलनात असणार आहे.

पालक व शिक्षकांना ५० रुपये शुल्क भरून संमेलनात सहभागी होता येईल. संपर्क – विलास – ८१०४६७३४५३, ऐश्वर्या – ८१०८८६२१४८.

शनिवार १४ डिसेंबर

  •  दुपारी २ ते ४ – वक्तृत्व स्पर्धा
  • दुपारी ४:३० ते ६:०० – सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाटय़
  •  संध्याकाळी ६.०० ते ७:३० – मराठी शाळांसाठी आम्ही काय करणार आहोत?

रविवार, १५ डिसेंबर

  •  सकाळी १०.३० ते १२:०० – मराठी शाळांमधील यशवंतांशी संवाद
  •  दुपारी १२:०० ते १.३० – मातृभाषेतील शिक्षण आणि बाबा म्हणून माझी भूमिका
  •  दुपारी २.३० ते ४:०० – मराठी शाळांबाबत कोणाचे काय चुकले?
  • दुपारी ४:३० ते ६.०० – होय! आम्ही मुलांना मराठी शाळेत घातले