तिकीटबारीवर एकाच वेळी दोन मराठी चित्रपट धुमधडाका उडवून देत असल्याचे दुर्मिळ चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ‘दुनियादारी’ने तरुणाईला मोहवत दोन कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला असताना आता ‘टाइम प्लीज-लव्हस्टोरी लग्नानंतरची’ या चित्रपटानेही एक कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने दहाच दिवसांत सव्वा कोटी रुपयांची कमाई केली .
नव्याने लग्न झालेले जोडपे लग्नानंतरच्या गमतीजमतींना, आव्हानांना कसे सामोरे जाते या विषयावरील हा चित्रपट दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी अत्यंत प्रगल्भपणे मांडला आहे. उमेश कामत, प्रिया बापट, सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ जाधव या चौघांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पूर्वप्रसिद्धीवरही भर दिला होता. एव्हरेस्ट एण्टरटेन्मेण्ट प्रस्तुत ‘टाइम प्लिज!’ या चित्रपटाने ९० चित्रपटगृहांतील एकूण १२७ पडदे व्यापत संपूर्ण महाराष्ट्रात दणक्यात सुरुवात केली होती.
या विषयातील सामान्यपणा आणि तरीही सर्वानाच या विषयाबद्दल असलेला जिव्हाळा या दोन प्रमुख गोष्टींमुळेच हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचला, असे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सांगितले.
चित्रपटाचे संगीतही लोकप्रिय झाल्याने  विद्यार्थ्यांनीही  चित्रपटाला गर्दी केली, असे एव्हरेस्ट एण्टरटेन्मेण्टच्या संजय छाब्रिया यांनी सांगितले.