यंदाचा १५ वा ‘मामि’ आयोजित मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पदार्पणातील चित्रपट दिग्दर्शकांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत मेक्सिकोच्या एका चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळाले. मात्र परीक्षकांचे सवरेत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक ‘ग्रॅन्ड ज्युरी अॅवॉर्ड’ ‘फॅन्ड्री’ या मराठी सिनेमाने पटकावून बाजी मारली.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फॅॅन्ड्री’ या चित्रपटाची निवड भारत सरकारच्या पुढील महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात करण्यात आली असून त्यात सोमनाथ अवघडे, सूरज पवार, किशोर कदम आणि राजश्री घाग या कलावंतांच्या प्रमुख भूमिका आहेत. पाच लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे.
चित्रपटाची थोडक्यात कथा सांगताना नागराज मंजुळे म्हणाले की, एका दलित मुलाने पाहिलेली स्वप्ने आणि न्यूनगंड यांच्या संघर्षांची कथा या चित्रपटात मांडली आहे. ‘मामि’मधील आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेमध्ये चित्रपटाची निवड होणे आणि परीक्षकांनी त्याचा गौरव करणे हे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वर्तुळामध्ये प्रतिष्ठेचे मानले जाते. पुरस्कार सोहळ्यानंतर समारोपाचा चित्रपट ‘फिफ्थ इस्टेट’ हा चित्रपट दाखविण्यात आला.