चित्रकार देवदत्त पाडेकर यांनी युरोपमधील निरनिराळ्या देशांतून आल्प्स पर्वतराजी तसेच त्याच्या भवतालाचे विविध ऋतूंमध्ये घडणारे विलोभनीय तसेच रौद्र-भीषण दर्शन चित्रबद्ध केले असून, या चित्रमालिकेचे प्रदर्शन इटालीतील फ्लोरेन्स डान्स सेंटरच्या आर्ट गॅलरीत १३ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत होणार आहे. हे चित्रप्रदर्शन भरविण्यासाठी ‘एटोइल टॉय व्हिज्युअल आर्ट्स, फ्लोरेन्स’ या कलासंस्थेने देवदत्त पाडेकर यांना खास निमंत्रित केले आहे. गेली तीन वर्षे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये स्वित्र्झलड, फ्रान्स, जर्मनी, इटाली आणि ऑस्ट्रिया या देशांतून केलेल्या भटकंतीमध्ये त्यांनी आल्पस्ची जी अनेकविध रूपे अनुभवली, त्यांना त्यांनी चित्ररूप दिले असून, ‘अ सिंफनी ऑफ सीझन्स’ या शीर्षकांतर्गत ती या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये तसेच बदलत्या भौगोलिक प्रदेशांनुसार बदलणारा आल्पस् पर्वतराजी परिसरातला निसर्ग केन्द्रस्थानी ठेवून त्यांनी ही चित्रमालिका रेखाटली आहे. चित्रकाराच्या दृष्टीतून त्यांना घडलेले आल्पस्चे रूपदर्शन असे या प्रदर्शनाचे स्वरूप आहे.

आनंदाचा क्षण..

इटलीतील फ्लोरेन्स शहरात मी २००६मध्ये ‘क्लासिकल ड्रॉइंग अ‍ॅण्ड पेंटिंग’ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. या काळात माझ्या एका मित्रासह मी फ्लोरेन्स डान्स सेंटर येथे एका चित्रप्रदर्शनाच्या कार्यक्रमास गेलो होतो. येथे होणाऱ्या चित्रप्रदर्शनाची सुरुवात ही त्यातील चित्रांच्या विषयावर आधारित नृत्याविष्कार सादर करून होते. हे पाहून मी हरखून गेलो. संस्थेच्या संचालकांना भेटून मी तेथे जाऊ लागलो व चित्रे काढू लागलो. या वेळी तेथे होणाऱ्या बॅले नृत्याविष्कारावर मी चित्रे काढली. यासाठी २००७-०९ मध्ये मी सलग तीन वर्षे वेगवेगळ्या महिन्यांत तेथे जात होतो व याच चित्रांचे पुढे २०१० मध्ये प्रदर्शनही भरले होते. या वेळी विमानातून तेथे पोहोचताना आल्प्स पर्वतरांगांचे विहंगम दृश्य दृष्टीस पडत असे. यामुळे २०१३-१५ या काळात वर्षांतून तीन-चार वेळा वेगळ्या ऋतूंमध्ये जाऊन मी आल्प्स पर्वतराजीची वेगवेगळी चित्रे काढली. याबद्दल फ्लोरेन्स डान्स सेंटरला कळल्यावर त्यांनी मला पुन्हा येथे प्रदर्शन भरविण्यासाठी आमंत्रित केले. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे.

देवदत्त पाडेकर, चित्रकार