गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या शोभायात्रांची नवी प्रथा आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. गुढीपाडव्यानंतरच्या शनिवारी (५ एप्रिल) लंडनजवळील स्लाव या शहरात स्थायिक मराठी मंडळींनी मराठी नववर्षांनिमित्त शोभायात्रा काढली आणि ब्रिटनच्या ‘हाय स्ट्रीट’वर गुढी उभारली. पारंपरिक भारतीय वेषात नटलेल्या स्लाववासीयांनी शोभायात्रेत भाग घेतला. त्याचप्रमाणे लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडूनही पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. चार पुणेरी ढोलांच्या साथीत महाराष्ट्र मंडळाच्या ढोल-ताशा पथकाने ‘डॉलिस हिल’चा भाग दणाणून सोडला.
लंडनच्या नैर्ऋत्येला असणाऱ्या स्लाव शहरात अनेक मराठीजन स्थायिक झाले आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या स्लाव मित्र मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरा होतो. पण यंदा प्रथमच मराठी नववर्ष दिन ब्रिटनमध्ये सार्वजनिक स्तरावर साजरा झाला.
स्लावच्या स्थानिक कौन्सिलच्या सहकार्याने ही शोभायात्रा ऐन शहरात ‘स्लाव हाय स्ट्रीट’ भागातून काढण्यात आली.
या शोभायात्रेला २५० च्या आसपास उपस्थिती होती. नऊवारी साडी, धोतर, झब्बा अशा पारंपरिक वेषात सजलेल्या ब्रिटनस्थित भारतीयांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात हाय स्ट्रीटवरून गुढी मिरवत नेली. स्लाव मित्र मंडळाचे अजय मुरुडकर ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, ‘ब्रिटनमध्ये शहराच्या मध्यवस्तीतून अशी मराठमोळी मिरवणूक प्रथमच निघाली. मी मूळचा मुंबईकर आहे आणि २००४ मध्ये गिरगावातून निघालेल्या पहिल्या शोभायात्रेत मी भाग घेतला होता. त्यापासूनच प्रेरणा घेऊन आम्ही इथे गुढीपाडव्याची शोभायात्रा काढायचा निर्णय घेतला. स्थानिक कौन्सिलनी याला पाठिंबा दिल्याने हे शक्य झाले.’
शोभायात्रेत भारतीय पारंपरिक नृत्येही सादर करण्यात आली. मुख्य बाजारपेठेच्या आवारात चार वर्षांपासूनच्या मुलांनी पारंपरिक नृत्य सादर केली. कथक, भरतनाटय़मयासारखी शास्त्रीय नृत्येही सादर झाली.