रामकृष्ण नायक यांना ‘जीवनगौरव’
यंदाच्या झी नाटय़गौरव पुरस्कारात ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ लाभलेल्या ‘दोन स्पेशल’ या नाटकाने बाजी मारली आणि सवरेत्कृष्ट नाटकासह सवरेत्कृष्ट दिग्दर्शन(क्षितिज पटवर्धन), नेपथ्य (प्रदीप मुळ्ये), संगीत (अनमोल भावे), अभिनेता (जितेंद्र जोशी) हे पुरस्कार मिळविले. धि गोवा हिंदू असोसिएशनच्या कला विभागाच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान देणारे रामकृष्ण नायक यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अमृता सुभाष (परफेक्ट मिसमॅच) हिला मिळाला.प्रायोगिक नाटकांमध्ये ‘एकूट समूह’ हे सवरेत्कृष्ट ठरले. हा सोहळा नुकताच ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात पार पडला. रामकृष्ण नायक यांना ज्येष्ठ हार्मोनिअम वादक पं. तुळशीदास बोरकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान सोहळ्यात डॉ. मोहन आगाशे, मोहन जोशी, अतुल परचुरे, प्रियदर्शन जाधव, संदीप पाठक व अन्य कलाकारांनी विविध नाटकांमधील काही प्रवेश सादर केले. महेश काळे यांनी काही नाटय़गीते सादर केली. सुबोध भावे, वैभव मांगले यांनी सूत्रसंचालन केले. येत्या १० एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता झी मराठीवरून या सोहळ्याचे प्रसारण केले जाणार आहे.