स्वयंपूर्ण करण्यासाठी निधी संकलन समितीची स्थापना

राज्य शासनाकडून दरवर्षी मिळणाऱ्या पाच लाखांच्या अनुदानावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अवलंबून असून या रकमेतून महामंडळाचा आस्थापना आणि अन्य खर्च भागविला जात आहे. महामंडळाला स्वत:चा आर्थिक उत्पन्न स्रोत नाही. महामंडळाला आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण करण्यासाठी गेल्या काही वर्षांत कोणतेच ठोस प्रयत्न झाले नसल्याने महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले आहे. यातून महामंडळाला बाहेर काढण्यासाठी निधी संकलन समितीची स्थापना करण्यात आली असून, महामंडळाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे.

राज्य शासनाकडून महामंडळाला दरवर्षी पाच लाख रुपयांचे अनुदान मिळते. यापैकी सुमारे साडेतीन लाख रुपये महामंडळाच्या कार्यकारिणीच्या वर्षांतून होणाऱ्या चार ते सहा बैठका, निवास, भोजन आणि प्रवास यावर खर्च होतात. तर सुमारे सव्वा लाख रुपये हे आस्थापनेवर खर्च केले जातात. हा सर्व खर्च वजा जाता महामंडळाच्या हातात फक्त २० ते २५ हजार रुपये शिल्लक राहतात.

साहित्य महामंडळाचा मूळ उद्देश मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या धोरणात व कार्यात एकसूत्रीपणा व सहकार्य निर्माण करणे, मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी व संवर्धनासाठी काम करणे हा आहे. पण गेल्या काही वर्षांत महामंडळाचे काम दरवर्षी साहित्य संमेलनाचे, महामंडळ वर्धापन दिनाचे आयोजन करणे आणि एका वार्षिक अंकाचे प्रकाशन एवढय़ापुरतेच मर्यादित राहिले आहे.

शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून न राहता महामंडळ आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण होण्याची तसेच मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीविषयी आस्था असणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविण्याची आवश्यकता आहे.

महामंडळाकडे पुरेसा निधी उभा राहिला तर मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीविषयी ठोस काम महामंडळाला करता येईल, या विचारातून महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यासाठी महामंडळ निधी संकलन समितीची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. जोशी यांच्या प्रयत्नांना कसे सहकार्य मिळते याकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अखिल भारतीय मराठी भाषकांची भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या अस्मितेची व्यापक चळवळ व्हावी. यासाठी लागणारा निधी मराठी व अमराठी भाषकांनी सढळहस्ते महामंडळाला उपलब्ध करून दिल्याशिवाय महामंडळाकडून अपेक्षित कार्य होणार नाही.

– डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ