|| नीलेश अडसूळ

लोकप्रियता, वाढता टीआरपी यांमुळे अन्य प्रादेशिक वाहिन्यांकडून दखल

मुंबई : एरव्ही हिंदीत लोकप्रिय झालेल्या मालिकांचा मराठीत रिमेक होत असताना, सध्या मराठी मालिकांची दखल हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जात आहे. मराठी मालिकांना मिळणारी लोकप्रियता आणि वाढता टीआरपी यामुळे मालिकांची ख्याती हिंदीसह अन्य प्रादेशिक वाहिन्यांपर्यंत पोहोचत असल्याचे वाहिनी प्रतिनिधींकडून समजते. त्यामुळे मराठी मालिकांचा रिमेक अन्य भाषांमध्ये केला जात आहे.

एखाद्या प्रादेशिक वाहिनीवर लोकप्रिय झालेला आशय विविध भाषेत आणण्याचा वाहिनी समूहाचा प्रयत्न असतो. यामध्ये दाक्षिणात्य भाषेतून हिंदीत आणि हिंदीतून मराठी असा आजवरचा साधारण रिमेकचा प्रवाह राहिलेला आहे. परंतु सध्या मराठीतील दर्जेदार आशयाला हिंदी आणि अन्य प्रादेशिक वाहिन्यांकडून मागणी मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेची प्रेक्षकांमध्येच नव्हे तर वाहिनी विश्वातही चर्चा आहे. जुलै महिन्यात या मालिकेचा ‘अनुपमा’ हा हिंदी रिमेक स्टार प्लस वाहिनीवर आला. ‘दिग्दर्शक म्हणून काम करताना हिंदीतील मालिका मराठीत करा, असे बऱ्याचदा सांगितले गेले. पण आपण दिग्दर्शित केलेली मराठी मालिका आज हिंदीत होतेय याचा आनंद वाटतो. हिंदीत जेव्हा ही मालिका करायची ठरली, तेव्हा त्यांच्या दिग्दर्शकांनी माझ्याशी संपर्क साधून पात्राचे बारकावे विचारले. विशेष म्हणजे मालिकेच्या डिझाइनचेही त्यांनी अनुकरण केले. अशा वेळी मालिकेचा अभ्यास सार्थकी लागल्यासारखे वाटते,’ असे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांनी सांगितले.

रिमेक झालेल्या मालिका

  •  मराठीतील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मधील ‘सूर्या-सरिता’ यांचा लग्नानंतरचा प्रवास हिंदी रिमेक ‘पंड्या स्टोर’ मध्ये लग्नाआधीपासून सुरू होताना दिसणार आहे.
  • आई कुठे काय करते’ या मालिकेचा केवळ हिंदीतच नाही तर बंगाली, कनडा, तेलगु आणि इतर सहा भाषांमध्ये रिमेक करण्यात आला आहे.
  • जीव झाला येडापिसा’ ही मालिका कलर्स हिंदीवर येऊ घातली आहे.
  • राजा रानीची गं जोडी’ ही मालिका कलर्स तामिळमध्ये रिमेक करण्यात आली आहे.

ज्या प्रादेशिक भाषेतील आशय त्या भाषेच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला आवडेल असा असतो. असा आशय इतर वाहिन्यांकडून निवडला जाणे याला नेटवर्क सिनर्जी म्हणतात. अशा गोष्टी मांडताना भाषेनुसार, प्रदेशानुसार बदल होतात पण मूळ गाभा तोच असतो.  – दीपक राजाध्यक्ष, प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी