नमिता धुरी हिंदीकडे वाढता कल; आयटी, परदेशी भाषांनाही मागणी इंग्रजी माध्यमात शिकण्याकडे वाढलेला कल, महानगरांमध्ये दैनंदिन व्यवहारात होणारा इंग्रजी आणि हिंदीचा सर्रास वापर, हिंदी चित्रपटांचा प्रभाव आणि गुणांसाठीची वाढती स्पर्धा; या सगळ्याचे प्रतिबिंब सध्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणावर उमटत असून मराठी विद्यार्थीही अकरावीला प्रवेश घेताना द्वितीय भाषा म्हणून हिंदीला प्राधान्य देत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्यामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये मराठी भाषा विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घसरते आहे. दहा महाविद्यालयांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रवेशांचा अभ्यास करून ‘लोकसत्ता’ने हे प्रातिनिधिक चित्र समोर आणले आहे. अकरावीत प्रवेश घेताना इंग्रजी प्रथम भाषा अनिवार्य असते, तर द्वितीय भाषेसाठी मराठीसह, आयटी, संस्कृत आणि परदेशी भाषांचा पर्याय असतो. आता तर चिनी आणि स्पॅनिश भाषाही निवडता येणार आहे. जिथे हे पर्याय जास्त तिथे मराठी निवडणाऱ्यांची संख्या घटते आहे. मराठी विद्यार्थ्यांनी हिंदूीला प्राधान्य देण्यात डहाणूकर आणि पोद्दार महाविद्यालये आघाडीवर आहेत. अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा बाद होण्याची स्थिती असताना मराठमोळ्या महाविद्यालयांमध्येही मराठीला अभय उरलेले नाही. रुपारेल महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये मराठी निवडणाऱ्यांची संख्या घसरते आहे. हिंदीच्या खालोखाल अनेक मराठी विद्यार्थी परदेशी भाषा आणि आयटीकडे वळताना दिसत आहेत. यामुळे मराठी शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या नोक ऱ्या जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ‘सेंट झेवियर्स’चा अनुभव सेंट झेवियर्स या अल्पसंख्याक महाविद्यालयात मराठीसाठी पुरेसे विद्यार्थी मिळत नसल्याने त्यासाठी प्राध्यापकही मिळत नव्हते. त्यामुळे गेली अनेक वर्षे अकरावीला मराठीचा पर्यायच बंद होता. या वर्षी महाविद्यालयाने स्वखर्चातून प्राध्यापकांची नेमणूक करून मराठीचा पर्याय सुरू केला. मात्र त्यासाठी मराठी विद्यार्थीच फारसे उत्सुक नाहीत. झेवियर्सच्या कला शाखेत मराठीसाठी २४ विद्यार्थी आहेत. त्यापैकी फक्त सात जण मराठी आहेत. याउलट फ्रेंच भाषेच्या वर्गात १६८ पैकी ३५ विद्यार्थी मराठी आहेत. विज्ञान शाखेत मराठीला चांगला प्रतिसाद आहे. मात्र ५५ पैकी फक्त २९ जण मराठी आहेत.