अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कारभाराविरोधात ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रकाशक एकत्र आले असून, त्यांनी बुधवारी मुंबईतील वि. प. मार्ग पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून महामंडळाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. वि. प. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय कांबळे यांनी हे निवेदन स्वीकारले.
ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, राजन खान, महेश केळुस्कर, अरूण म्हात्रे, भारत सासणे ‘अनुबंध’ प्रकाशनचे अरविंद कुलकर्णी यांच्यासह इतर साहित्यिकांनी हे निवेदन पोलीस ठाण्यात दिले. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर आणि साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सबनीस यांची निवड प्रक्रिया वैध पद्धतीने पार पडलेली नाही. त्यामध्ये अनेक त्रुटी असून, गैरप्रकारही झाले आहेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पुढील महिन्यात साहित्य महामंडळाचे कार्यालय नागपूरमध्ये जाणार आहे. तत्पूर्वी या निवडणूक प्रक्रिये संदर्भातील सर्व कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घ्यावीत. अन्यथा ती नष्ट केली जातील, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
साहित्य महामंडळाचे नोंदणी कार्यालय मुंबईत असल्यानेच मुंबईतील वि. प. मार्ग पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2016 4:43 pm