महापालिकेच्या शीव रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे हंगामी अधिष्ठाता म्हणून पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वात ज्येष्ठ प्राध्यापक असलेल्या डॉ. सुलेमान र्मचट यांना अधिष्ठातेपद न देता त्यांना डावलण्याचे उद्योग प्रशासनाकडून करण्यात येत असल्यामुळे थेट न्यायालयात जाऊन न्याय मिळविण्याची भूमिका डॉ. र्मचट यांनी घेतली आहे. तर ‘मार्ड’ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने तसेच शीव रुग्णालयातील पाचशे विद्यार्थी डॉक्टरांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र लिहून डॉ. र्मचट हेच अधिष्ठाता म्हणून हवेत अशी मागणी केली आहे.
एखादा अध्यापक अधिष्ठाता म्हणून हवा अशी विद्यार्थी व डॉक्टरांनी लेखी मागणी करण्याची पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी पाच वर्षे संचालक व आठ वर्षे अधिष्ठाता म्हणून काम केलेल्या डॉ. संजय ओक यांनाही प्रशासनाने जाणीवपूर्वक सहआयुक्त केले नव्हते. एवढेच नव्हे तर एमआरआय खरेदीत त्यांची पद्धतशीर बदनामीच केली गेल्याने त्यांनी कंटाळून राजीनामा दिला.
आता शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. र्मचट यांनाही २०१० साली आयुक्तांच्या स्वाक्षरीने खरेदी करण्यात आलेल्य ‘एमआरआय’ प्रकरणी चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लावून बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे पालिकेतील ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
डॉ. र्मचट हे गेली ३१ वर्षे पालिकेच्या सेवेत असून रेडिऑलॉजी विभागाचे विभागप्रमुख म्हणून तसेच शीव रुग्णालयाचे हंगामी अधिष्ठाते म्हणून गेल्या वर्षभरात त्यांनी रुग्णालयात अनेक सुधारणा केल्या. विविध विभागांच्या सुधारणांसाठी प्रयत्न तसेच संशोधनाला चालना दिली. त्यामुळे रुग्ण व डॉक्टरांमध्ये ते कमालीचे लोकप्रिय झाले.
मात्र राज्य शासनाचे स्वयंस्पष्ट असलेले सेवाज्येष्ठतेबाबतचे आदेश डावलून शीव आणि नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातेपदाची भरती राज्य लोकसेवा आयोगाकडे सोपविली. तेथेही डॉ. र्मचट यांना डावलण्यासाठी ३२ वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवाची अट टाकून प्रशासनाने डॉ. र्मचट यांना मुलाखतीसाठी अपात्र ठरवले.
या विरोधात त्यांनी दाद मागून एकही उमेदवार या नियमाखाली पात्र ठरू शकत नाही हे दाखवून दिल्यानंतर घाईघाईने त्यांना ‘एमपीएससी’च्या मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले खरे परंतु आपल्याला डावलण्यात येणार हे स्पष्ट झाल्यामुळे त्यांनी
उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी तात्काळ यात लक्ष न घातल्यामुळे आता विद्यार्थी व डॉक्टरच डॉ. र्मचट यांच्यासाठी लढण्यास सज्ज झाले आहेत, असे मार्डच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

अधिष्ठातापद नियुक्ती प्रकरण
*    डॉ. मर्चट यांची सेवाज्येष्ठता डावलण्याचा प्रशासनाचा घाट
*    डॉ. र्मचट यांना कायमस्वरुपी अधिष्ठाता नेमण्याची ‘मार्ड’ची मागणी
*    ५०० डॉक्टर-विद्यार्थ्यांचे आयुक्तांना पत्र
*    डॉ. र्मचट न्यायालयाचे दार ठोठावणार