राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असलेल्या मर्दानी-२ चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलिज झाला. या ट्रेलरला चांगली पसंती मिळते आहे. मुलींना, महिलांना पद्धतशीरपणे लक्ष्य बनवणाऱ्या सीरियल रेपिस्टला पकडण्यासाठी धडपड करणारी शिवानी शिवाजी रॉय अर्थात राणी मुखर्जी आपल्याला या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहण्यास मिळते आहे. हा सिनेमा मुंबईतील शक्ती मिल बलात्कार प्रकरणावर आधारीत आहे अशी चर्चा आहे. अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढते आहे आणि अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचारही वाढत आहेत हे या सिनेमात पाहण्यास मिळणार आहे.

अशा प्रकारच्या सिनेमांना कारण ठरतात त्या सत्य घटना. बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट्स असं या सिनेमाचं टायटल आहेच. अशीच आहे या सिनेमाची कथा. मुंबईतील शक्ती मिल बलात्कार प्रकरणावर मर्दानी २ सिनेमाची कथा आधारीत आहे असं समजतं आहे. शक्ती मिल बलात्कार प्रकरणामुळे सगळा देश हादरला होता. २०१३ मध्ये एका महिलेवर पाच जणांनी क्रूर बलात्कार केला आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी २ गुन्हेगार अल्पवयीन होते.

“देशाला हादरवणाऱ्या खऱ्याखुऱ्या घटनेतून प्रेरित होऊन या चित्रपटाची धाटणी तयार केली गेली आहे. यमुना एक्स्प्रेस वे प्रकरणापासून शक्ती मिल्स प्रकरणांपर्यंतच्या अनेक प्रकरणांतून मर्दानी २ ची संहिता उभी राहिली. हा अत्यंत कठोर, हादरवणारा आणि वास्तवाच्या जवळ जाणारा चित्रपट असून भारतात होणाऱ्या वास्तव घटनांशी या चित्रपटातले प्रसंग मेळ घालणारे आहेत. लेखक (गोपी पुथरन) यांनी बाल गुन्हेगारी व भारतातील महिलांविरुद्धचे गुन्हे या विषयावर अभ्यास व संशोधन करण्यात खूप वेळ खर्ची घातला आहे. शक्ती मिल्स बलात्कार प्रकरणही असेच असून बालगुन्हेगारांनी केलेल्या बलात्काराच्या सुरूवातीच्या काही घटनांपैकी ती एक घटना होती.” असं पुरथन यांनी सांगितलं.

याबाबत बोलण्यासाठी मर्दानी 2 चे लेखक-दिग्दर्शक गोपी पुथरन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “देशात महिलांविरुद्ध होत असलेल्या पाशवी, अमानुष गुन्ह्यांमध्ये आणि आमच्या चित्रपटांमध्ये तुम्हाला साम्य आढळून आलेच, तर मर्दानी 2 हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी समाजाचा आरसा ठरेल, असे म्हणता येईल. बाल गुन्हेगारांकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या वाढत चालली असून देशाला हादरवणाऱ्या अशा काही घटनांवर आधारीत मर्दानी 2 हा चित्रपट आम्ही तयार केला. आपल्याभोवती नेमके काय चालू आहे आणि त्याकडे लक्ष देण्यासाठी आपण सर्वांनीच डोळ्यात तेल घालून जागे रहायला हवे, हे समाजाला सांगण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. आपण खूपच जागरुक असायला हवे. कारण, कुणाच्याही वयावरून त्या व्यक्तीचा गुन्हा किंवा गुन्हेगारी मानसिकता ओळखता येत नाही.”

मर्दानी 2 मध्ये राणी मुखर्जीने अत्यंत धीट आणि निष्ठावंत पोलीस अधीक्षक शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली आहे. यापूर्वीच्या मर्दानी या चित्रपटाला खूप लोकप्रियता मिळाली असून त्याप्रमाणेच तिने मर्दानी 2 मध्ये जीव ओतून काम केले आहे. पहिल्या मर्दानी या चित्रपटात तिने ‘चाईल्ड ट्रॅफिकिंग रॅकेट’ उधळून लावणाऱ्या धाडसी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका पार पाडली होती. मर्दानी 2 मध्ये वयाने लहान पण तरीही अत्यंत भयावह अशा खलनायकाशी राणीचा सामना होणार आहे.