|| जयेश शिरसाट

रोजगारची संधी आटल्याने स्थलांतरित श्रमिकांसमोर यक्षप्रश्न

मुंबई : मागणीचा अभाव, अपुरी दळणवळणाची साधने यांमुळे शिथिलीकरणानंतरही मुंबईतील अनेक लघुउद्योग जवळपास ठप्प आहेत. लघुउद्योगांचे केंद्र असलेले धारावी, वडाळा-शिवडी आणि वांद्रे येथे फे रफटका मारल्यास ही मरगळ स्पष्टपणे जाणवते.‘ग्रीड ९१’ संस्थेच्या दाव्यानुसार मुंबई महानगर प्रदेशातून (एमएमआर) सुमारे ३० लाख स्थलांतरित मजूर एप्रिल, मे महिन्यांत आपापल्या राज्यांत गेले. त्यापैकी ३० टक्के  मजूर परतले. त्यापैकी अनेकजण बेरोजगार आहेत. पूर्वी सात ते आठजण मिळून खोली भाड्याने घेत. ते सगळे

परतलेले नाहीत. त्यामुळे घरभाड्याचा भार दोन ते तीन मजुरांवर पडतो. नव्याने खोली भाड्याने घेताना अनामत रक्कमही द्यावी लागेल. तुलनेने किफायतशीर ठरणारी लोकल सेवा सुरू नसल्याने प्रवासाचा प्रश्न आहेच. उत्पादकांचेच कं बरडे मोडल्याने कमी मजुरीत जास्त काम करून घेण्याचाही पायंडा पडण्याच्या बेतात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काम मिळेल याची शाश्वती उत्पादकांनाच नाही तर मजुरांना कशी असेल, अशी प्रतिक्रि या कापड व्यावसायिक जयेश भानुशाली व्यक्त करतात.

धारावीतील चर्मोद्योग ठप्प

ब्रिटिशांच्या काळात चामडे कमावणे, त्यावर प्रक्रि या करून विविध वस्तू बनवण्याचा उद्योग धारावीत सुरू झाला. १९८०च्या दशकात या वस्तूंचे पहिले ‘शो रूम’ पिवळा बंगला परिसरात सुरू झाले. सध्या अशी अनेक दुकाने सुरू आहेत. पावसाळी तीन महिने सोडल्यास वर्षभर कातडी वस्तूंचे उत्पादन, विक्री सुरू असते. दिवाळीत विविध कं पन्या आपल्या कामगारांसाठी भेटवस्तू म्हणून कातडी वस्तूंची घाऊक मागणी करतात. दिवाळीच्या दोन ते तीन महिन्यांआधी अशा ‘ऑर्डर’ सुरू होतात. सध्या अशी एकही मागणी आलेली नाही. टाळेबंदीआधी तयार के लेल्या लाखो रुपयांच्या वस्तू, कच्चा माल कारखाने आणि दुकानांत पडून आहे. नवे काम नसल्याने मजूर मुंबईत आले तरी त्यांना हा उद्योग काम देऊ शकणार नाही, असे कातडी डत्पादक, निर्यातदार रमेश कदम सांगतात. टाळेबंदीत या दुकानांमध्ये ग्राहक फिरकलेला नसला तरी कातडी वस्तूंना बुरशी धरू नये म्हणून काळजी घेण्यापुरते दुकान उघडतो, ही प्रतिक्रि या दुकानदार चंद्रकांत खाडे यांनी दिली.

प्लास्टिक उद्योगालाही फटका

कचरा, भंगार म्हणून गोळा के लेल्या प्लास्टिकचे दाणे तयार करणारे सुमारे अडीचशे कारखाने धारावीत होते. हे उत्पादन प्लास्टिकच्या वस्तू तयार करणाऱ्या मोठ्या कं पन्यांना विकले जाते. मात्र मागणीच नसल्याने हा उद्योग पूर्णपणे ठप्प आहे. या उद्योगावर सुमारे एक लाख मजूर अवलंबून होते, असा दावा धारावी बिझनेसमेन असोसिएशनचे फरिदुद्दीन सिद्धिकी करतात.

तयार कपड्यांचा बाजार सुना

वांद्रे आणि वडाळा-शिवडीच्या रफी अहमद किडवई मार्गावरील तयार कपड्यांच्या बाजारपेठेतही अशीच मरगळ आहे. अंतर्वस्त्रे वगळता सर्व प्रकारच्या कपड्यांची निर्मिती जवळपास बंद आहे. कापड उद्योगावर २० टक्के  स्थलांतरित मजूर अवलंबून होते. परिस्थिती सुधारत नाही, तोवर शिवणकामातील कु शल कारागिरांच्या हाताला काम मिळणार नाही, असे निरीक्षण व्यावसायिक अजय बिंद यांनी नोंदवले. वडाळ्याच्या बाजारपेठेत ‘एम९९’ कं पनीचे मालक मोहम्मद अल्फान फारुखी टाळेबंदीपूर्वी १५ ते २० हजार जीन्स तयार करून देशभर पाठवत. सध्या मागणीच नसल्याने १० टक्के  उत्पादन घेणेही त्यांना शक्य नाही.