राकेश मारिया यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी झाली असली तरी बहुचर्चित शीना बोरा प्रकरणाचा तपास त्यांच्याकडेच असल्याचे गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी जाहीर केले होते. मात्र तडकाफडकी बदलीमुळे नाराज मारिया हा तपास स्वीकारणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंगळवारी मारिया यांना बढती देऊन आयुक्तपदावरून हटविण्यात आले होते. मारिया बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणचा तपास करत होते. या प्रकरणामुळेच त्यांची बदली केल्याची चर्चा होती. परंतु गृहविभागाने त्याचे खंडन करून हा तपास मारिया यांच्याकडेच राहणार असल्याचे रात्री उशिरा स्पष्ट केले होते. माझ्याकडे या प्रकरणाचा तपास करण्याबाबत कुठलेही लेखी पत्र आलेले नाही असे सांगून राकेश मारिया यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला. परंतु या बदलीमुळे प्रचंड नाराज झालेले आणि हा प्रकार जिव्हारी लागल्याने मारिया शीना बोरा प्रकरणाचा तपास करणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मुळात तपास मारिया यांच्याकडेच ठेवायचा होता तर मग बदली का केली, असा सवाल त्यांच्या निकटवर्तीयांनी केला. मारिया नाराजीमुळे राजीनामा देतील अशी चर्चा दिवसभर रंगली होती. पण मी राजीनामा देण्याचा विचार केला नसल्याचे खुद्द मारिया यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी मारिया यांना लेखी पत्र देऊन शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.