यंदा चांगल्या पावसामुळे फुलांची भरघोस आवक झाली असली तरी गणेशोत्सवाचे निमित्त साधत किरकोळ व्यापाऱ्यांनी फुलांचे दर चढेच ठेवले आहेत. दादर येथील फूल बाजारात सगळ्याच प्रकारची फुले शनिवारप्रमाणेच गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला महागातच विकली जात होती. रविवारी झेंडूची फुले ११० रुपये किलो तर सजावटीसाठी वापरण्यात येणारी ऑर्किडच्या केवळ चार फुलांसाठी भाविकांना १८० रुपये मोजावे लागत होते. तरीही, मात्र दादरमध्ये भाविकांनी फुलांसह अन्य सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

गणेश आगमनाच्या आधी रविवार असल्याने अनेकांनी खरेदीसाठी दादर स्थानकाजवळील रानडे रस्ता, छबिलदास गल्ली येथे गर्दी केली होती. फूल बाजारात दरवर्षीप्रमाणेच यंदाही फुलांचे भाव गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी चढेच राहिल्याने ग्राहकांना भरुदड सहन करावा लागला. शनिवारप्रमाणेच रविवारीही दादरमध्ये फुलांचे दर वधारलेले होते.

फुलांच्या पाठोपाठ फळेही महाग झाली. सफरचंद १२० रुपये किलो, केळी व चिक्कू ६० रुपये डझन तर गणपतीनिमित्त विशेष करून विक्री करण्यात येणारे पपनस हे फळदेखील १२० रुपये होते.

सजावट साहित्यही महाग

गणेशोत्सवाआधी फुलांच्या किमती वाढल्याप्रमाणेच सजावट साहित्यही चढय़ा दराने विकण्यात येत होते. दिव्यांची माळ ३०० रुपयांपासून पुढे, तर कंठी व मोत्यांचे हार हे २०० रुपयांच्या पुढे विकण्यात येत होते. शेवटचा दिवस असूनही थर्माकॉलचे मखर १५०० रुपयांवरून थेट ३ हजार ५०० व मोठे मखर ५ हजार ८०० रुपयांवर व्यापारी विकताना दिसले.

फुलांचे भाव – रविवार

  • गुलछडी (किलो) – १२० रुपये
  • लाल-पिवळे झेंडू – (किलो) ११० रुपये
  • ऑर्किडची चार फुले गुलछडीसह – १८० रुपये
  • दुर्वा व शमी जुडी – ३० रुपये
  • पिंगळी व कवंडळ – ४० रुपये