मात्र ग्राहक, शेतकऱ्यांचीही निराशा

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्यासाठी बाजारात झेंडूच्या राशी येऊनही फुलांचे भाव चढेच राहिले आहेत. शेतकऱ्यांकडून वीस रुपये किलोच्या भावाने झेंडूची खरेदी केली जात असून किरकोळ विक्रीत मात्र झेंडूचे भाव १८० ते २०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्याचवेळी मुंबईत गाडी लावण्यासाठी व विक्रीसाठी कोणतेही मार्गदर्शन नसल्याने झेंडू मातीमोल किंमतीत विकल्याची निराशा शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे.

दोन वर्षांनंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे अन्नधान्यासोबत फुलांच्या उत्पादनातही भरघोस वाढ झाली आहे. याची झलक गणेशोत्सवादरम्यान दिसली होती. सततच्या दुष्काळामुळे दोन ते तीन महिन्यात नगदी उत्पन्न देणाऱ्या फुलशेतीकडे शेतकरी वळल्यामुळे नाशिक, औरंगाबाद, सांगली, सातारा या जिल्ह्य़ांमध्ये फुलांच्या लागवडीखालील जमीन वाढली आहे. त्याचेच परिणाम यावर्षी दिसत असून गणेशोत्सवानंतर आता दसऱ्यानिमित्त मुंबई-ठाण्यात गेले चार दिवस लाल-पिवळ्या मोठय़ा आकाराच्या झेंडूची प्रचंड प्रमाणात आवक झाली आहे. शहराच्या मुख्य बाजारांसोबत गल्लीबोळातही झेंडूंची तोरणे करण्याचे काम जोरात सुरू आहे. लहान बाजारात ५० रुपये पावकिलोने झेंडू विक्री सुरू असून दादर, बोरीवली येथील मोठय़ा बाजारातही झेंडू १६० रुपये किलोपर्यंत मिळत आहेत. मात्र दसऱ्यादिवशी हे भाव २०० रुपयांपर्यंत जातील, असे दादर फूलबाजारातील विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात मोठय़ा प्रमाणात झेंडू येऊनही त्याचा फायदा ग्राहकांना मिळत नसतानाच फुलशेतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांही पदरी निराशाच पडत आहे.

दुष्काळ आणि अवकाळी पाऊस यामुळे द्राक्षपिकांचे खूप नुकसान झाल्याने नाशिकमधील अनेक शेतकरी फुलशेतीकडे पर्यायी पीक म्हणून पाहू लागले. त्यातच यावेळी चांगला पाऊस पडल्याने फूलशेतीतून भरपूर उत्पादन झाले. मात्र गणेशोत्सवानंतर भाव पडला. झेंडू पाच रुपये किलोने दिला तर कधीकधी खराब होत असलेला झेंडू खुडून टाकला. आता साधारण २० रुपये प्रति किलोने झेंडू विकला जात आहे. त्यातूनच मुंबईपर्यंतच्या वाहतुकीचा खर्च द्यावा लागत असल्याने हाती काहीच येत नाही, असे नाशिकमधील शेतकरी सोपान काठे म्हणाले.