सुहास जोशी

मुंबईचा ‘रत्नहार’ अशी ओळख असलेला ऐतिहासिक मरिन ड्राइव्ह आणि त्याला लागूनच असलेली गिरगाव चौपाटी हा परिसर सध्या वेगळ्या स्थित्यंतरातून जात आहे.. इथे नेमके काय होणार? यंत्रसामग्री, एवढी तोडफोड, धुळीचे लोट आणि भराव हे सध्याचे येथील दृश्य आहे. परंतु ‘लवकरच या ‘रत्नहारा’चा एक किलोमीटरचा पट्टा दुपेडी होईल, मग मुंबईचे सौंदर्य आणखीच वाढेल, असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे असले, तरी सध्या राणीच्या रत्नहाराचे लावण्य हरवले आहे.

सागरी किनारा मार्गाच्या (कोस्टल रोड) कामासाठी या परिसरात प्रचंड यंत्रसामग्री दाखल झाली आहे. छोटी चौपाटी ते प्रिन्सेस स्ट्रीटचा उड्डाणपूल या टप्प्यातील सध्याच्या समुद्री पदपथावर रस्तारोधक लावण्यात आले आहेत. श्वास घेण्यासाठी काही मोकळ्या जागा दिसतात, पण त्याही लवकरच भरल्या जातील आणि मरिन ड्राइव्हचा श्वास गुदमरून जाईल.

मरिन ड्राइव्ह ते गिरगाव चौपाटी या राणीचा रत्नहार (क्वीन्स नेकलेस)अशी ओळख असलेल्या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर तोडफोड आणि बांधकाम सुरू असल्याने संपूर्ण परिसराचा चेहरामोहराच बदलला आहे. इतका की टाळेबंदीनंतर या परिसराला भेट देणाऱ्यांना आपण अपरिचित ठिकाणी तर आलो नाही ना, असा प्रश्न पडावा! त्यामुळे पुढील दोन वर्षे तरी मुंबईकरांना आणि पर्यटकांना या परिसरात पूर्वीची अनुभूती मिळणे कठीण असेल.

राणीचा रत्नहार ही मुंबईची दृश्य ओळख आहेच, पण त्याचबरोबर मुंबईकरांसाठी चार घटका विसावण्याचे, व्यायामासाठी धावण्या-चालण्याचे, मनोरंजनाचे ठिकाण आहे. या ठिकाणाचा इतिहास रंजक आहे. समुद्रात भराव टाकून बांध घालण्याचे काम १९१५ ते १९२० दरम्यान करण्यात आले होते. तेव्हा चौपाटी ते पारसी जिमखाना हा परिसर ‘के नडी सी फे स’ म्हणून ओळखला जात असे. १९३० नंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस आर्ट डेको शैलीतील इमारतींचे काम दहा वर्षे सुरू होते. पारसी जिमखाना ते नरिमन पॉइंट परिसरातील बांध हा नंतरच्या टप्प्यातील. मरिन ड्राइव्हच्या एका बाजूस असणाऱ्या इमारती, मध्ये रस्ता, बाजूला समुद्री पदपथ, लागूनच समुद्रातील टेट्रापॉड आणि पुढे अथांग पसरलेला समुद्र अशा या परिसराचे विहंगम दृश्य हे एखाद्या रत्नहाराप्रमाणे दिसते.

मरिन ड्राइव्हवरील आर्ट डेको शैलीतील वास्तू आणि मोकळी जागा हा परिसर मरिन ड्राइव्ह प्रसिमा (प्रेसिंक्ट) म्हणून ओळखला जातो. यामध्ये ९४ वास्तू आणि एक मैदान यांचा समावेश आहे. यास जागतिक वारसा दर्जा लाभला असून या शैलीतील इमारती मोठय़ा संख्येने असलेले हे जगातील महत्त्वाचे ठिकाण आहे. नवीन समुद्री पदपथ हा गिरगाव छोटी चौपाटी ते आर्ट डेको शैलीतील वास्तूंच्या सुरुवातीच्या टप्प्यापर्यंत होईल.

होणार काय?

मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा सागरी किनारा मार्गाचे काम गिरगाव येथे छोटय़ा चौपाटीजवळ सुरू आहे. दक्षिण मुंबईतून येणाऱ्या वाहतुकीस भुयारी मार्गापर्यंत जाण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मरिन ड्राइव्ह येथील समुद्री पदपथाचा (प्रोमोनेड) वापर केला जाईल अशी माहिती पालिकेच्या अभियंत्यांनी दिली. त्या ठिकाणी होणाऱ्या नव्या रस्त्याची रुंदी सुमारे ११ मीटर इतकी असेल. त्यापासून आठ मीटर रुंदीचा नवीन समुद्री पदपथ समुद्रात बांधण्यात येईल. त्यासाठी भरावाऐवजी खांबांचा वापर केला जाईल आणि त्याखाली टेट्रापॉड असतील असे अभियंत्यांनी सांगितले. परिणामी भविष्यात राणीच्या रत्नहाराच्या विहंगम दृश्यातील या टप्प्यात टेट्रापॉड दिसणार नाहीत.

परिणाम काय?

सागरी किनारा मार्गाच्या कामामुळे राणीच्या रत्नहारातील सुमारे एक किमीचा टप्पा तोडावा लागेल. मात्र तो पुन्हा मूळ रचनेस अनुरूप जोडण्यात येईल असे पालिकेच्या अभियंत्यांनी सांगितले. या ठिकाणच्या दृश्य स्वरूपास धक्का लागणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे, अभियंत्यांनी स्पष्ट केले. किनारा मार्गाच्या या टप्प्यात सध्याच्या समुद्री पदपथावर पारसी समाजाचे जलदेवतेला समर्पित करण्याच्या हेतून उभारलेले  ‘पारसी गेट’ हे दोन दगडी स्तंभ आहेत. हे स्तंभ हटविण्यासाठी विरोध होत असून, पालिकेने हे स्तंभ तात्पुरते हटवून काम पूर्ण झाल्यावर मूळ ठिकाणास समांतर नवीन समुद्री पदपथावर बसविण्याचा प्रस्ताव दिला आहे. अद्याप त्याबाबत काही प्रतिसाद आला नसल्याचे अभियंत्यांनी नमूद केले.

समुद्रातून पदपथ..

राणीच्या रत्नहाराला समांतर सुमारे एक किमीचा नवीन समुद्री पदपथ (प्रोमोनेड) बांधण्यात येईल. प्रिन्सेस स्टीट्रवरून मरिन ड्राइव्ह येथे उतरणाऱ्या उड्डाणपुलापासून ते सागरी किनारी मार्गाच्या गिरगाव चौपाटीजवळील भुयारापर्यंतच्या टप्प्यात हा नवीन समुद्री पदपथ असेल. त्याची रचना सागरी किनारा मार्गापासून आठ मीटर आत समुद्रात असेल. त्यासाठी मरिन ड्राइव्ह येथील समुद्री पदपथाचा या टप्प्यातील भाग तोडावा लागेल.