छायाचित्र काढताना तोल गेल्याने मृत्यू; उधाणलेल्या समुद्रासोबत तरुणाईचा खेळ पोलीस बंदोबस्तानंतरही सुरूच

तरुणवर्गातील सेल्फीची हौस अनेकदा प्राणघातक ठरत असल्याच्या घटना उजेडात आल्यानंतरही याचे गांभीर्य तरुण-तरुणींना उमगले नसल्याचे बुधवारी आणखी एका घटनेतून समोर आले. मरिन ड्राइव्ह येथे समुद्राला भरती असताना कठडय़ावर उभी राहून सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका १७ वर्षीय तरुणीचा तोल जाऊन मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी काही काळ या परिसरातील कठडय़ावर चढण्यास मज्जाव केला होता. परंतु, तरीही समुद्राच्या भरतीचा आनंद लुटण्याचा तरुणाईचा हट्टाग्रह कायम होता.

चुनाभट्टी येथे राहणारी प्रीती भिसे गिरगाव चौपाटी येथील भवन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. मंगळवारी दुपारी ती मैत्रिणींसोबत मरिन लाइन्सला समुद्रकिनारी फिरायला आली होती. दुपारी तीनच्या सुमारास कठडय़ावर उभी राहून सेल्फी काढत असतानाोोल जाऊन ती समुद्रात पडली. समुद्राला भरती असल्याने तिच्या मैत्रिणींना व मरिन लाइन्सला फिरण्यास आलेल्या पर्यटकांना तिला वाचविताही आले नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, जीवरक्षक व अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. परंतु सततच्या पावसामुळे त्यात अडथळे येत होते. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास तिचा मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागला. आजूबाजूचे भान न बाळगता सेल्फी काढण्यात गुंतून जाणे कसे जिवावर बेतू शकते याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा या घटनेने आले आहे. २०१६च्या जानेवारी महिन्यात वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्डच्या किनाऱ्यावर तरन्नुम नामक १९ वर्षीय तरुणीचा मैत्रिणीसोबत सेल्फी घेताना पाण्यात पडून मृत्यू झाला होता. या मुलीला वाचविण्याकरिता समुद्रात उडी मारणाऱ्या रमेश वाळुंज या तरुणालाही या दुर्घटनेत जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पोलिसांनी सेल्फी घेणाऱ्या उत्साहींना इशारा देणारे फलक समुद्रकिनारे, टेकडय़ा, किल्ले अशा ठिकाणी लावण्यास सुरुवात केली. मात्र हे इशारे धुडकावून सेल्फीचा खुळा नाद आजही अनेकांच्या जिवावर बेतत आहे.

सेल्फीचा खुळा नाद

  • ९ जानेवारी, २०१६- तरन्नुम या १९ वर्षांच्या तरुणीचा मैत्रिणीसोबत सेल्फी काढताना बॅण्डस्टॅण्ड येथील समुद्रात पडून मृत्यू. तिला वाचविण्यास गेलेल्या रमेश वाळुंज या तरुणाचाही बुडून मृत्यू
  • ८ ऑक्टोबर २०१६- अ‍ॅग्नेल पेरिस या २५ वर्षांच्या मुलाचा लोणावळा येथे सेल्फी काढताना पाय घसरल्याने दरीत पडून मृत्यू.
  • ४ नोव्हेंबर २०१६- मोहम्मद शाबीर अहमद खान या १४ वर्षांच्या मुलाचा मीरा रोड स्टेशन येथे सेल्फी काढताना लोकलचा धक्का लागून मृत्यू.
  • फेब्रुवारी, २०१७- सोमनाथ म्हात्रे या सर्पमित्राचा बेलापूरमध्ये उत्साहाच्या भरात विषारी सापासोबत सेल्फी घेताना सर्पदंशाने मृत्यू.
  • मे, २०१७- मोनाश्री प्रिया राजेश या २१ वर्षांच्या तामिळनाडू येथून कुटुंबासोबत मुंबई दर्शनाकरिता आलेल्या तरुणीचा बॅण्डस्टॅण्ड येथे सेल्फी काढताना समुद्रात बुडून मृत्यू.