24 November 2020

News Flash

Dussehra 2020 : व्यावसायिकांना ‘सुवर्णदायी’ आशा

सोने खरेदीसाठी प्रतिसाद; घरांसाठी चांगली नोंदणी अपेक्षित

सोने खरेदीसाठी प्रतिसाद; घरांसाठी चांगली नोंदणी अपेक्षित

मुंबई : घर, सोने, वाहन, विद्युत उपकरणे यांच्या खरेदीचे पाडवा आणि अक्षय्यतृतीयेचे मुहूर्त करोना प्रादुर्भावामुळे साधता न आलेली बाजारपेठ दसऱ्याबाबत आशादायी आहे. सोने खरेदीचा प्रतिसाद वाढत असून घरांसाठीही चांगली नोंदणी होईल अशी आशा व्यावसायिकांना आहे.

करोना प्रादुर्भावाचा बाजारपेठेला फटका बसला. घर, वाहने, सोने, विद्युत उपकरणे अशा मोठय़ा खरेदीचे म्हणून ओळखले जाणारे पाडवा आणि अक्षय्यतृतीया हे मुहूर्त टाळेबंदीत गेले. पाडव्याच्या तोंडावरच टाळेबंदी लागू झाली. वेतनात कपात, नोकऱ्या गेल्यामुळे, व्यावसाय ठप्प झाल्यामुळे खरेदीदारांकडील पैशाची आवकही कमी झाली. त्यामुळे गेले सहा ते सात महिने बाजारपेठ थंडावली होती. मात्र, दसऱ्याच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा बाजारपेठेची परिस्थिती सुधारेल आणि ग्राहकांचा खरेदीकडे वाढता ओघ राहील, अशी आशा व्यावसायिकांनी व्यक्त केली.

गर्दी टाळण्याची खबरदारी

दरवर्षी दसऱ्याला बाजारपेठ गजबजते. दुकानांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. यंदा मात्र, गर्दी आटोक्यात राहील, याची खबरदारी व्यावसायिक घेत आहेत. खरेदीसाठी रांग लावणे, वळे, नाणे यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे, दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर राहील यासाठी ग्राहकांना जागा निश्चित करून देणे, अशी तयारी व्यावसायिकांनी केली आहे.

संगणक, मोबाइलला मागणी

ऑनलाइन शाळा, घरून काम यांमुळे संगणक, मोबाइल यांना सहा महिन्यांपासून मागणी वाढली आहे. दसरा, येऊ घातलेली दिवाळी या पाश्र्वभूमीवर अनेक कंपन्यांनी नवी मॉडेल्स बाजारात आणली आहेत. दसऱ्याच्या दिवशीही या उपकरणांची खरेदी वाढेल, असे मत दुकानदारांनी व्यक्त केले.

सोने खरेदी करण्याकडे आठवडय़ापासून कल वाढला आहे. यंदा दरवर्षीप्रमाणे नाही तरी दसऱ्याला सोने खरेदी वाढेल. वाहतुकीची साधने अजून नाहीत, ग्राहकांच्या मनात अजून काहीशी भीती आहे. पाडवा आणि अक्षय्यतृतीयेला खरेदी करता आली नाही म्हणून ती खरेदी दसऱ्याला होईल असे नाही. कारण त्यानंतर परिस्थितीत बदल झाला आहे. मात्र, तरीही सोने खरेदी करण्याकडे ग्राहक वळले आहेत. बचतीच्या दृष्टीने सोन्यावरील विश्वास वाढला आहे. त्यामुळे आशा आहे.

– आशीष पेठे, वामन हरी पेठे सन्स

****

‘बरेच दिवसांनी मुहूर्त आहे. सोने खरेदी ग्राहकांनी सुरू केलेली आहे. गेल्या वर्षांबरोबर सध्या तुलना करणे योग्य ठरणार नाही. कारण गेल्या वर्षी सोन्याचा दरही कमी होता आणि परिस्थिती वेगळी होती. परंतु दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी नक्की वाढेल.’ – सुहास मुसळूणकर,

व्ही. एम. मुसळूणकर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड

***********

‘मार्चपासून टाळेबंदी लागू झाल्यामुळे ज्यांचे नियोजन होते त्यांना खरेदी करता आलेली नाही. शिवाय स्टॅम्प डय़ुटीही कमी झाली आहे. त्यामुळे दसऱ्याला खरेदी वाढेल.’

– सतीश मगर, अध्यक्ष क्रेडाई

***

‘महिनाभरात झाला नाही तेवढा व्यवसाय एका दिवसात होईल असा विश्वास आहे. करोनाची लस येईपर्यंत ‘घर’ हाच आधार आहे. स्वत:चे घर असावे अशी प्रत्येकाची नेहमीच इच्छा असते. त्यामुळे गृह खरेदी चांगलीच होणार.’

– राजन बांदेलकर, माजी अध्यक्ष नरेडको

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 3:02 am

Web Title: market is optimistic about dussehra 2020 zws 70
Next Stories
1 टीआरपी वाढवण्यासाठी पैशांचे वाटप!
2 मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त
3 मुंबई महापालिकेचं पथक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर
Just Now!
X