जयेश शिरसाट

चीनमधील करोनाच्या वाढत्या संसगामुळे मुंबई आणि दिल्लीतील बाजारपेठांच्या पोटात गोळा आणला आहे. करोना नियंत्रणात न आल्यास येत्या सहा महिन्यांतील तीन महत्त्वाचे व्यापार हंगाम हातचे जाण्याची भीती मुंबईतील व्यापारी व्यक्त करत आहेत.

चिनी वस्तू विकणाऱ्या मुंबईतील सर्व घाऊक आणि किरकोळ व्यापारी-व्यावसायिकांचे लक्ष २५ फेब्रुवारीकडे लागले आहे. त्या दिवशी चीनमधील उत्पादन, बाजारपेठा कधी सुरू होणार याबाबतचा निर्णय होणार असल्याचे मुंबईतील व्यापाऱ्यांनी सांगितले.

दरवर्षी नववर्षांचे स्वागत आणि त्यानिमित्त होणाऱ्या विविध महोत्सवांमुळे संपूर्ण चीनमध्ये सुटी जाहीर केली जाते. यंदा ही सुटी २५ जानेवारी ते १२ फेब्रुवारीपर्यंत जाहीर केली गेली होती. करोनाच्या पाश्र्वभूमीवर १५ जानेवारीला चीनहून अखेरचे जहाज नित्योपयोगी वस्तू घेऊन भारताकडे निघाल्याची माहिती पादत्राणांचे घाऊक व्यापारी अमीन कुडीया यांनी दिली. चीनमध्ये अमीन यांचे कार्यालय होते. काही वष्रे त्यांनी तेथे वास्तव्य करून व्यवसाय केल्याने त्यांना तेथील महोत्सवादरम्यानच्या परिस्थितीची माहिती आहे. चीनमधील या सुटीची जाणीव भारतातील सर्वच व्यापारी, व्यावसायिकांना असते. त्यामुळे सुटी जाहीर होण्यापूर्वी जादा माल मागवण्यावर त्यांचा भर असतो. यंदा १३ फेब्रुवारीनंतर तेथील बाजारपेठ खुली होणार होती. मात्र करोना संसर्गामुळे मार्चच्या पहिल्या आठवडय़ात बाजारपेठा सुरू होतील, अशी माहिती चीनमधील उत्पादक- घाऊक विक्रेत्यांनी आपल्याला दिल्याचे अमीन यांनी सांगितले. तेथील बाजारपेठा ३ मार्चला सुरू होणार का, याबाबतचा निर्णय २५ फेब्रुवारीला होणार असल्याचे अमीन यांनी लोकसत्ताला सांगितले.

मार्चच्या पहिल्या आठवडय़ात चीनमध्ये वस्तूंचे उत्पादन सुरू झाले तरी त्या वस्तू भारतात येईपर्यंत ऑगस्ट-सप्टेंबर उजाडेल. तसे झाल्यास एप्रिलपासून सुरू होणारा रमझानचा महिना, उन्हाळी सुट्टय़ा, पावसाळा, गणेशचतुर्थी, दिवाळी आदी विक्री हंगामांमध्ये भारतातील चिनी वस्तूंची बाजारपेठ कोलमडेल. त्याचा फटका सरकारच्या तिजोरीपासून रस्त्यावरील फेरीवाल्यांपर्यंत सर्वाना बसेल, असे निरीक्षण व्यापारी जावेद मर्चंट यांनी नोंदवले. रमझानच्या महिन्यात कपडय़ांपासून अनेक प्रकारच्या वस्तूंना मोठी बाजारपेठ असते. उन्हाळी सुट्टय़ांमध्ये प्रवासी बॅगा, कपडय़ांची विक्री अधिक असते. मेमध्ये लग्नाचा हंगाम असतो. या काळात इमिटेशन ज्वेलरी, सौंदर्यप्रसाधनांची विक्री जास्त होते. पावसाळ्यात छत्री, रेनकोट आणि शैक्षणिक साहित्याची खरेदी होते. गणेश चतुर्थी किंवा दिवाळीत सजावटीच्या वस्तूंना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. हे सर्व हंगामांना करोना संसर्गाचा फटका बसेल, अशी भीती मर्चंट यांनी व्यक्त केली.

चीनमध्ये नवनवीन वस्तू उत्पादित होतात. महिन्या दोन महिन्यांत आधीची वस्तू जुनाट वाटू लागते, त्याची मागणीही कमी होते. दुसरीकडे भारतीय बनावटीच्या, चीनच्या तुलनेने जास्त टिकाऊ किंवा दुरुस्त करता येतील अशा वस्तू खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल बऱ्याच अंशी कमी झाला आहे. स्वस्त आणि पुन्हा विकत घेणे अवाक्यात असलेल्या वस्तूंकडे भारतीय ग्राहकांचा कल वाढल्याचे मुंबईतल्या व्यापाऱ्यांचे निरीक्षण आहे.

मुंबईसारख्या शहरांत मोबाईल आणि त्यांची उपकरणे किंवा सुटय़ा भागांची बारमाही बाजारपेठ आहे. अ‍ॅपल कंपनीचे बहुतांश मोबाईल कॅलिफोनिर्यात उत्पादित होतात पण त्याची बांधणी चीनमध्ये होते. भारतीय बाजारपेठेत विकली जाणारी मोबाईल फोन उपकरणे, वस्तूंचे (मोबाइल अ‍ॅक्सेसरी) उत्पादन चीनमध्ये सर्वाधिक होते. करोनामुळे त्यांच्या आयातीवर परिणाम झाल्यास येथील व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

चीनमधील गोंझाव्ह शहरातील नानफंगताशा, शेन्झेन, यूव आदी शहरांमध्ये मोबाइल अ‍ॅक्सेसरीबरोबरच खेळणी, गॉगल, मनगटी घडय़ाळे, विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू, पादत्राणे, तयार कपडे, सौंदर्यप्रसाधने, इमिटेशन ज्वेलरी, वेष्टनांचे साहित्य, फर्निचर, काचेची भांडी किंवा झुंबर, कटलरी, महिलांच्या बॅग किंवा पर्स आदींची मोठी बाजारपेठ आहे. त्यांची आयात न झाल्यास येथील व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.

ब्रॅण्डची नक्कल

एखाद्या ब्रॅण्डेड वस्तूची हुबेहूब नक्कल चीनमध्ये सर्वाधिक होते. जगप्रसिद्ध ब्रॅण्डची हुबेहूब नक्कल असलेली चिनी बनावटीची मनगटी घडय़ाळे मुंबईत उपलब्ध होतात. रोलेक्ससारख्या महागडय़ा घडय़ाळांची नक्कल येथे ५०० रुपयांना विकली जाते. विशेष म्हणजे हे घडय़ाळ दुरुस्तीसाठी कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडे दिले तरीही ते अस्सल की बनावट हे त्यांना सांगता येत नाही. या बाजारपेठेवरही करोनाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.