मुंबईत सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असले तरी दोन आठवडय़ांवर आलेल्या दिवाळीच्या खरेदीची चाहूलही आता बाजारपेठांना लागली आहे. सर्व मुंबईकरांच्या पसंतीचे ठिकाण असलेल्या दादरप्रमाणेच उपनगरांतील बाजारपेठांमधील रस्ते गर्दीने फुलू लागले असून क्रॉफर्ड मार्केटमध्ये तर शनिवारी उसळलेल्या ग्राहकांच्या गर्दीने वाहतूक कोंडी झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अर्थात वाहतुकीच्या या कोंडीचा ग्राहकांच्या उत्साहावर बिलकूल परिणाम झाला नव्हता. कपडय़ांना लावण्याच्या चापांपासून ते चादरींपर्यंत, कपबशीपासून ते लहानमोठय़ांच्या कपडय़ांपर्यंत, तोरणांपासून ते सजावटीचे सामान घेण्यासाठी मुंबईकरांनी विविध ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. मुंबईची मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दादरच्या बाजारपेठेतही हेच चित्र होते. त्याचप्रमाणे बोरिवली, लिंक रोड, अंधेरी लोखंडवाला, ठाण्याचा गोखले मार्ग या ठिकाणच्या बाजारपेठांमध्येही खरेदीदारांनी रस्ते गजबजून गेले होते. शुक्रवापर्यंत बाजारपेठ थंडच होती, पण दिवाळीपूर्वीचा दुसरा शनिवार असल्याने खरेदीदारांनी मोठी गर्दी केल्याचे क्रॉफर्ड मार्केटमधील कपडय़ांचे व्यापारी घनश्याम दानी यांनी सांगितले. रविवारीही येथे हेच चित्र दिसले असते. पण, हा प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने राजकीय नेत्यांच्या फेऱ्या या भागांत मोठय़ा संख्येने निघतील. त्यामुळे, रविवारी बाजारपेठ बंद राहणार आहे, असे दानी यांनी नमूद केले.
फराळसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दुकानांमध्ये महिलावर्गाने मोठी गर्दी केली होती. शनिवारपासून दिवाळी खरेदीचा उत्साह जाणवू लागल्याचे दादरमध्ये तयार फराळसाहित्याची विक्री करणाऱ्या ‘फॅमिली स्टोर्स’चे अभिजीत जोशी यांनी सांगितले. ‘बोरिवलीच्या दुकानांमध्ये मात्र खरेदीने म्हणावा तसा उत्साह पकडलेला नाही. कदाचित निवडणुकीनंतर दिवाळीच्या खरेदीला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल,’ अशी शक्यता ‘इंद्रप्रस्थ’ या शॉपिंग सेंटरमधील व्यापाऱ्यांच्या संघटनेचे सहखजिनदार चिराग जोशी यांनी व्यक्त केली. बोिरवलीच्या फेरीवाल्यांकडे मात्र उलट चित्र होते. दुपारच्या टळटळीत उन्हातही त्यांच्याकडे गर्दी होती.  
मुंबईत वाहतूक कोंडी!
खरेदीला झालेल्या गर्दीमुळे जे. जे. उड्डाणपूल वाहतुकीने इतका गच्च भरला होता की वाहनचालक या पुलाऐवजी मोहम्मद अलीचा रस्ता धरू लागले होते. वाहतुकीची कोंडी सीएसटीच्या पुढेही होत होती. त्यामुळे, सीएसटी ते नरिमन पॉइंटचे दहा मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्धा तास लागत होता.