04 July 2020

News Flash

बाजारपेठांनी धूळ झटकली, पण..

मालाचा तुटवडा, मजुरांची कमतरता, वाहतुकीचीही अडचण

छाया: दीपक जोशी

नीलेश अडसूळ, अमर सदाशिव शैला

टाळेबंदी टप्प्याटप्प्याने मागे घेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून शुक्र वारी दादर, लालबाग, परळ, भायखळा येथील बाजारपेठा अंशत: उघडल्या, परंतु मालाचा तुटवडा, मजुरांची कमतरता, वाहतुकीची गैरसोय यामुळे दुकानदारांचा पहिला दिवस धूळ झटकण्यातच गेला.

दादर, लालबाग, परळ, भायखळा, मोहम्मद अली मार्ग, अब्दुल रेहमान मार्ग, महात्मा जोतिबा फुले मंडई या महत्त्वाच्या बाजारपेठांमधील २० ते ३० टक्के दुकाने उघडली होती. ग्राहकांची वाट पाहून कं टाळलेल्या विक्रेत्यांनी दुपारनंतर दुकानांना पुन्हा टाळे लावले. पालिकेच्या नियमानुसार एका दिवशी एका बाजूची दुकाने उघडण्याचा नियम कुठेही अमलात येताना दिसला नाही.

दोन महिन्यांनंतर बाजारपेठ उघडल्याने प्रत्येक दुकानामध्ये साफसफाईचे काम सुरू असल्याचे दिसत होते. एखाददुसरे दुकान वगळता कुठेही फारशी गर्दी नव्हती. दादर येथील कपडय़ांची घाऊक बाजारपेठ सकाळी सुरू झाली, पण ग्राहक नसल्याने दुकानदारांनी ४ वाजता दुकाने बंद केली. ‘पावसाळ्यात सुती कपडय़ांना विशेष मागणी नसते. त्यात हाताशी कामगार नाहीत. दुकाने उघडली तरी व्यवसाय एवढय़ात होणार नाही. कारण लोकल गाडय़ा, बस अद्याप सुरू झालेल्या नाहीत,’ असे प्रकाश मोतीराम या व्यापाऱ्याने सांगितले.

लोकप्रिय असलेली हिंदमाता परिसरातील कपडय़ांची बाजारपेठ मात्र आज बंदच होती. भायखळा, मोहम्मद अली मार्ग परिसरातील कपडे, गृहोपयोगी वस्तू, बांधकाम साहित्य, नळ, घडय़ाळे आदी वस्तूंची  दुकाने उघडली होती.

आजचा दिवस दुकान सावरण्यात गेला. दुकानात काम करणारे मजूरही गावी आहेत. पुढचे सहा महिने ते येतील असे वाटत नाही. त्यामुळे मालकालाच हमालाचे काम करावे लागणार आहे. शिवाय ग्राहक आणि कामगार दुकानापर्यंत कसे पोहोचणार अशीही चिंता असल्याचे तिथल्या एका व्यापाऱ्याने सांगितले.

वाहतूक व्यवस्था सुरू नसल्याने बांधकामस्थळी साहित्य पाठविण्यात अडचणी येत आहेत. अनेक व्यापाऱ्यांचा माल नेणारी एकत्रित मालवाहतूक व्यवस्था अद्याप बंद आहे. त्यामुळे पाठवण्याचा माल कमी आणि त्यासाठीचे भाडे मात्र अधिक असा  नुकसानीत व्यवसाय सुरू आहे, असे अब्दुल रेहमान मार्गावरील मोहिज बालासिनोरवाला या हार्डवेअर व्यापाऱ्याने सांगितले.

शैक्षणिक साहित्याला मागणी

अब्दुल रेहमान मार्ग येथील शैक्षणिक साहित्याच्या दुकानांपुढे बऱ्यापैकी गर्दी दिसली. पेन, पेन्सिल, वह्य़ा, चित्रकलेचे साहित्य घाऊक स्वरूपात घेणारे अनेक किरकोळ दुकानदार तेथे आले होते. ‘गर्दी असली तरी गोदामातून माल आणण्यासाठी कामगार नाहीत. सकाळपासून मी एकटाच धावपळ करतो आहे,’ असे लकी स्टेशनरीमध्ये काम करणाऱ्या चंद्रकांत सावंत यांनी सांगितले. शाळा सुरू झाली नसली तरी अनेक शाळांमधून मुलांना ऑनलाइन अभ्यास दिला जातो. त्यासाठी शैक्षणिक साहित्याती आवश्यकता असल्याचे तिथे आलेल्या एका ग्राहकाने सांगितले.

काही प्रमाणात नुकसान

ग्रँट रोड येथील इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेतील काही दुकाने उघडली होती. अडीच महिने बाजार बंद असल्याने काही दुकानांचे उंदरांनी नुकसान केले आहे. काही दुकानांमध्ये पाणी गळती झाल्याने नुकसान झाले होते. बहुतांश ठिकाणी दुकानदार साफसफाई करताना दिसत होते. काही दुकानदार पावसाळापूर्व कामे करीत होते. पंरतु ही कामे करण्यासाठी कुशल मजूर मिळत नसल्याने दुकानदारांची अडचण होत आहे, अशी माहिती ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक असोसिएशनचे अध्यक्ष नितेश मोदी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2020 12:57 am

Web Title: markets partially opened abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 पाळीव श्वानांना घराबाहेर २० मिनिटे फिरवण्यास मुभा
2 सामायिक प्रवेश परीक्षेचे केंद्र बदलता येणार
3 खाजगी रुग्णालयांच्या लुटीला लगाम!
Just Now!
X