माणसाने माणसाला मारल्यानंतर माणूस गुलामगिरीतून मुक्त होतो, अशा खुळचट मार्क्‍सवादी-नक्षलवादी विचाराची भलामण करणाऱ्या तथाकथित विद्वानांचा पीडितांच्या दु:खमुक्तीसाठी लढणारी आंबेडकरी चळवळ खंडित करण्याचा डाव आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांनी केली. पुरोगामित्वाच्या आडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा तिरस्कार केला जात आहे, अशा लोकांचा संघटितपणे मुकाबला करण्याचे आवाहन त्यांनी आंबेडकरवादी विचारवंत व कार्यकर्ते यांना केले.
‘फुले-आंबेडकर विचारधारा’ या संघटनेच्या वतीने ‘आंबेडकरवादाची दिशा, कार्ल मार्क्‍स की गौतम बुद्ध’ या विषयावर जाहीर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होता. त्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ढाले यांनी अलीकडे आंबेडकरवादाशी मार्क्‍सवादाची सांगड घालण्याचा प्रयत्न करणारे विचारवंत आनंद तेलतुंबडे आणि फुले-मार्क्‍स-आंबेडकरी अशी नवी मांडणी करणारे कम्युनिस्ट नेते शरद पाटील यांच्यावर टीका केली.  
कार्ल मार्क्‍सच्या संबंध तत्त्वज्ञानात सर्व चिकित्सेची सुरुवात धर्मचिकित्सेपासून होते हे एकच वाक्य महत्त्वाचे आहे. मग भारतातील कम्युनिस्टांनी मार्क्‍सच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे धर्मचिकित्सा केली काय आणि एका तरी कम्युनिस्टाने मानवतेचा अपमान करणाऱ्या धर्माचा त्याग केला आहे काय, असा सवाल त्यांनी केला. तेलतुंबडे यांच्या एका मुलाखतीतील आंबेडकरी अनुयायांनी आंबेडकरवाद निर्माण केला नाही, या विधानाचा ढाले यांनी समाचार घेतला. आंबेडकरवाद हा आंबेडकरी विचारात आहे की अनुयायांच्या डोक्यात, असा सवाल त्यांनी केला.
भारतातील जातीव्यवस्थेतून कशा प्रकारचे शोषण होते, याची जाणीव मार्क्‍सला नव्हती. मार्क्‍सवादावर आधारलेली कम्युनिस्टांची चळवळ ही मजुरांना केवळ पगारवाढ मिळवून देणारी चळवळ आहे. मजुरांच्या हिताची चळवळ ही मानवमुक्तीची चळवळ होऊ शकते का, अशी विचारणा त्यांनी मार्क्‍सवादाच्या समर्थकांना केली. आंबेडकरी विचार हा सर्व पीडितांच्या दु:खमुक्तीची चळवळ आहे. डॉ. आंबेडकरांनी त्यासाठीच माणसाने माणसाशी कसे वागावे हे सांगणारा आणि जगाची पुनर्रचना करण्याचा विचार मांडणाऱ्या बुद्ध तत्त्वज्ञानाला जवळ केले. परंतु फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन आणि स्वत:ला वरून पुरोगामी व आतून जातीयवादी मंडळींचा सध्या आंबेडकरी चळवळीत धांगडधिंगा सुरू आहे. अशा ढोंगी लोकांचा वैचारिक प्रतिकार करण्यासाठी आंबेडकरवादी विचारवंत-कार्यकर्त्यांनी संघटित झाले पाहिजे, असे आवाहन ढाले यांनी केले.