मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, दादर, एलटीटी स्थानकांत सुविधा; १२ स्थानकांत ‘हेल्थ एटीएम’ही बसवणार

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी मध्य रेल्वे स्थानकात स्वयंचलित व्हेंडिंग मशीनमधून मुखपट्टी, जंतुनाशक आणि हातमोजे देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही सुविधा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर उपलब्ध होईल. याशिवाय १२ स्थानकांत हेल्थ एटीएमही बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांसाठी दिलेल्या प्रवासाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवाशांनी मुखपट्टी वापरावी, हातांची स्वच्छता, श्वसनाचे आरोग्य पालन केले पाहिजे आणि पर्यावरणीय स्वच्छता राखली पाहिजे. म्हणूनच, कोविड- १९ प्रतिबंधात्मक साहित्य रेल्वेच्या आवारात प्रवाशांसाठी सहज उपलब्ध करून देण्याच्याही सूचना आहेत. त्यानुसार स्वयंचलित व्हेंडिंग मशीनमधून हातमोजे, जंतुनाशक, मुखपट्टी उपलब्ध केले जाणार आहे. याशिवाय मुंबईत अपुरा वेळ आणि वेगवान जीवनामुळे काहींना नियमित आरोग्य तपासणी करता येत नाही. प्रवाशांची आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी कल्याण, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे हेल्थ एटीएम किओस्क सुरू केले आहेत.

सीएसएमटीसह वडाळा रोड, चेंबूर, पनवेल, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, डोंबिवली आणि बदलापूर इत्यादी १२ उपनगरी स्थानकांवरदेखील हेल्थ एटीएम बसविण्यासाठी ई-निविदा मागवल्या आहेत. रक्तदाब, मधुमेह, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि इतर आरोग्याशी संबंधित १६ ते १८ प्रकारची आरोग्य तपासणी  ग्राहकांना येथे मिळू शकते. त्वरित आरोग्य तपासणी करण्याची इच्छा असणारा कोणताही प्रवासी यापैकी कुठल्याही वैद्याकीय किओस्कमध्ये तपासणीसाठी जाऊ शकेल. येथे वैद्यकीय परिचारक कर्मचारी असतील.

या सेवांमध्ये १६ प्रकारची चाचणी केवळ नाममात्र ५० रुपयांमध्ये तसेच हिमोग्लोबिन आणि रक्तदाबासाठीही चाचणी केल्यास एकूण १८ प्रकारच्या चाचणीसाठी १०० रुपये होतील.