मुंबईबाहेरून येणाऱ्यांसाठी मुंबईची ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या वास्तूला हेरिटेज वास्तूचा दर्जा असला, तरी या वास्तूत बुधवारी ड्रिल यंत्रांची घर्र्घर्र् घुमली. महाव्यवस्थापकांच्या इमारतीतील जिन्यांवरील लाल गालिचा निसटू नये, यासाठी त्याभोवती धातूची पट्टी बसवण्यासाठी ही भोके पाडण्यात येत होती. मात्र प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ही भोके नव्याने पाडली नसून अनेक वर्षे जुनी आहेत. या भोकांतील माती व इतर कचरा साफ करण्यासाठी तसेच धातूच्या पट्टीवर भोके पाडण्यासाठी ड्रिल यंत्राचा वापर झाला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू २० नोव्हेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर मध्य रेल्वेवरील महाव्यवस्थापक इमारतीच्या जिन्यांवर लाल गालिचा अंथरला जात आहे. या इमारतीतील जिन्यांना कोणताही ठोस आधार नसून ते एकमेकांवर तोललेले आहेत. त्याशिवाय ही इमारत हेरिटेज दर्जाची असून इमारतीच्या बांधकामाला धोका पोहोचेल, असे कोणतेही काम करणे निषिद्ध आहे.
मात्र हा गालिचा जिन्यांवर भक्कम राहावा आणि चालताना सटकू नये, यासाठी त्याभोवती धातूची पट्टी बसवली जाते. ही पट्टी बसवण्यासाठी बुधवारी दुपारी जिन्यांना भोके पाडण्याचे काम चालू होते. त्यासाठी ड्रिल यंत्राचा वापर केला जात होता. ही गोष्ट इमारतीच्या बांधकामासाठी धोकादायक ठरू शकते.
याबाबत रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता, हा गालिचा नेहमीच अंथरला जात असून त्यात नवीन काहीच नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच ड्रिल यंत्राचा वापर करून जिन्यांना नाही, तर धातूच्या पट्टय़ांना भोके पाडली जात होती. जिन्यांना याआधीच भोके पाडली असून ती खूप जुनी आहेत. त्यात माती किंवा इतर कचरा अडकला असल्यास तो साफ करण्यासाठी ड्रिल यंत्राचा वापर केला जातो, असा खुलासाही करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र ही भोके धातूच्या पट्टीबरोबरच जिन्यांनाही पाडली जात असल्याचे दिसत होते.