सलीम खान, नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर, हेलन मानकरी

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे संगीत, नाटय़, कला आणि सामाजिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारे मास्टर दीनानाथ पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आले.

प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांना या वर्षीचा संगीत आणि कला क्षेत्रातील मास्टर दीनानाथ पुरस्कार देऊ न सन्मानित करण्यात येणार असून मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना प्रदान करण्यात येणार आहे.

प्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबाकडून दरवर्षी दिले जाणारे हे पुरस्कार या वर्षी २४ एप्रिल रोजी मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात प्रदान करण्यात येतील. ‘सीआरपीएफ’चे महासंचालक विजयकुमार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या वर्षीच्या विजेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील.

भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रासाठी प्रसिद्ध लेखक वसंत आबाजी डहाके यांना वाग्विलासिनी पुरस्कार दिला जाणार आहे. भद्रकाली प्रॉडक्शनचे ‘सोयरे सकळ’ हे नाटक मोहन वाघ पुरस्काराने वर्षांतील सर्वोत्तम नाटक म्हणून गौरवण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तालयोगी आश्रमचे पंडित सुरेश तळवळकर यांना आनंदमयी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक विजयकुमार यांना जवानांसाठी सामाजिक कार्य करणारी मान्यताप्राप्त संस्था ‘भारत के वीर’साठी सन्मानित केले जाणार आहे. प्रतिष्ठानने या वेळी हा पुरस्कार पुलवामा हल्लय़ात शहीद झालेल्या जवानांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. सोहळ्यात शहिदांच्या नातलगांना एक कोटी रुपयांचे साह्य़ देण्यात येणार आहे.

मास्टर दीनानाथ यांच्या स्मृती जपण्यासाठी मंगेशकर कुटुंबामार्फत मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. त्यात विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाते. आमच्या या अद्वितीय कार्यात सर्वच लोकांकडून भरपूर मदत मिळत आहे, याचा आनंद वाटतो.

– पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर