News Flash

प्रसूतिगृहाची जागा भाजप नगरसेविकेच्या संस्थेला?

भाजपमध्ये अंतर्गत वाद; मनसेचे आंदोलन

(संग्रहित छायाचित्र)

भाजपमध्ये अंतर्गत वाद; मनसेचे आंदोलन

ठाणे : ठाण्यातील नौपाडा भागात प्रसूतिगृह आणि आरोग्य केंद्रासाठी आरक्षित जागा एका भाजप नगरसेविकेशी संबंधित संस्थेला देण्यावरून नगरसेवकांमध्येच अंतर्गत वाद उफाळून आला आहे. प्रस्तावाविरोधात शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. योग्य भूमिका न घेतल्यास आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

नौपाडा भागात प्रसूतिगृह आणि आरोग्य केंद्रासाठी आरक्षित जागा आहे. तिथे महापालिकेचे रात्र निवारा केंद्र सुरू होते. त्याला भाजपच्या स्थानिक नगरसेविकांनी विरोध केल्यामुळे महापालिकेने रात्र निवारा केंद्र बंद केले. आता ‘द ऊर्जा’ या बचत गटाला ही जागा देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. तो शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. त्यावरून भाजपच्या स्थानिक नगरसेवकांमध्येच अंतर्गत वाद उफाळून आला असतानाच त्यात आता मनसेने उडी घेतली आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यामध्ये महिलांची संख्या मोठी होती. महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘मी लाभार्थी’ असे लिहिलेले फलक घेऊन निदर्शने केली.

प्रसूतिगृह आणि आरोग्य केंद्र उभे राहिल्यास स्थानिकांना फायदा होईल. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष जाधव यांनी केली. सर्वसाधारण सभेत प्रस्तावास मान्यता मिळाली तर त्यावर आयुक्तांनी योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, या संदर्भात भाजपचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 1:14 am

Web Title: maternity house land for bjp corporator organization 2
Next Stories
1 राणीबागेच्या विस्तारीकरणाला मान्यता
2 भाजी मंडईत कपडेविक्री
3 विद्यापीठ-महाविद्यालयातील विसंवादाचा विद्यार्थिनीला त्रास
Just Now!
X