गणित हा विषय म्हटला की, अनेकांच्या पोटात धडकी भरते; पण जगात गणितावर प्रेम करणारी मंडळीही आहेत. केवळ पाठांतर करून गुण मिळवण्यापेक्षा गणिताचा पाया समजून घेऊन गणिताची मजा अनुभवण्याची आवड अनेकांना आहे. अशीच आवड असलेल्या मनन खुर्मा याने देशातील तमाम विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. हे करत असताना तो गृहिणींना व्यवसायाची संधीही देतो.

आयआयटीसारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेणे हे अभियांत्रिकी करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी व प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी पालक कर्ज काढून किंवा विविध मार्गानी लाखो रुपये उभे करून आपल्या पाल्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज होतात; पण यात सर्वानाच यश येते असे नाही. अनेकदा मुलांची कुवत नसते तरीही त्यांना हा अभ्यास करण्यासाठी लाखो रुपये भरून कोचिंग क्लासला पाठविले जाते. अब्जावधीचा व्यवसाय करणारे कोचिंग क्लास ही गोष्ट त्या मुलांना सांगत नाही. त्यांना बडी स्वप्ने दाखवत तुम्ही यशस्वी व्हाल असे सांगितले जाते. मात्र तुमच्या गणिताचा पाया कच्चा आहे. अभियांत्रिकीसाठी गणिताचा अभ्यासच नव्हे तर गणितावर प्रेम करणे आवश्यक आहे, ही बाब या विद्यार्थ्यांना कोणी समजावूनच सांगत नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होतो. आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये गणित हा विषय सूत्र पाठांतर करा आणि यशस्वी व्हा असाच शिकविला जातो. नेमके हे सूत्र असेच का आहे त्याच्या मुळापर्यंत कोणीच जात नाही. गणितातील एखादे उत्तर नेमके असेच का आहे याची पद्धती विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगितलीच जात नाही. हीच सल आयआयटी दिल्लीमधून पदवीधर असलेल्या मननला स्वस्थ बसू देत नव्हती. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर गणितावरील प्रेमामुळे मननने दिल्लीतील काही क्लासेसमध्ये गणित शिकविण्यास सुरुवात केली. शिकवण्याचे काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांचे गणित खूपच कच्चे असल्याचे त्यांना जाणवले; पण प्रवेश परीक्षांची शिकवणी घेत असताना त्यांचा पाया भक्कम करणे शक्य नसते. जर या विद्यार्थ्यांना शालेय वयातच गणिताचे पायाभूत शिक्षण दिले तर विद्यार्थी भविष्यात चांगली कामगिरी करू शकतील. यामुळे मननला विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच थोडे अधिकचे गणित शिकविण्याची गरज जाणवू लागली आणि यातूनच http://www.cuemath.com चा जन्म झाला.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
foreign women prostitution, prostitution Kharghar,
वेश्याव्यवसायप्रकरणी परदेशी महिलांवर कारवाई
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?
voting centers in pune will be manage by college students
मतदान केंद्रांचा कारभार पुण्यातील युवक-युवतींकडे… होणार काय?

असे चालते काम

स्वत: गणिताचा शिक्षक असलेल्या मननने जेईई या प्रवेश परीक्षेसाठी गणित या विषयाची काही पुस्तकेही लिहिली. यानंतर २०१३ मध्ये त्याने बालवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणितात आवड निर्माण व्हावी यासाठी स्वत: प्रयत्न करण्याचे ठरविले. मनन तसेच परदेशातील विद्यापीठांमध्ये पदवीधर झालेले काही गणित विषयाचे पदवीधर आणि तज्ज्ञ यांनी विद्यार्थ्यांना गणित कशा पद्धतीने शिकविता येईल याचा विचार सुरू केला. यानंतर त्यांनी लहान मुलांच्या बालरोगतज्ज्ञांशी चर्चा करून त्यांची मानसिकता लक्षात घेऊन प्रत्येक इयत्तेसाठी विशेष अभ्यासक्रम तयार केला. या अभ्यासक्रमात शालेय गणिताबरोबरच व्यावहारिक तसेच सैद्धांतिक गणिताचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी शालेय शिक्षणाबरोबरच गणिताच्या इतर बाबींवरही विचार करू शकतो. हे वर्ग ऑनलाइन न ठेवता याचे शिकवणी वर्ग सुरू करावे असा निर्णय झाला. ही शिकवणी घेण्यासाठी काही कौटुंबिक कारणांमुळे करिअरचा मार्ग बंद केलेल्या पदवीधर गृहिणींची नियुक्ती करण्याचे ठरले. या गृहिणींना प्रशिक्षित करण्यासाठी त्यांनी एक विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे. ज्या गृहिणी गणिताचे शिक्षक होऊ इच्छिता अशा गृहिणी संकेतस्थळाची नोंदणी करून अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्यांना एक प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र दिल्यानंतर ती गृहिणी अधिकृत शिक्षिका होते, अशी माहिती मननने दिली. आठवडय़ातून तीन वेळा हे वर्ग भरविले जातात. हे वर्ग सुरू करण्यासाठी त्यांना कोणतीही रक्कम द्यायची गरज नसल्याचेही मननने स्पष्ट केले. आत्तापर्यंत देशातील सहा शहरांमध्ये दोन हजार केंद्रे असून दहा हजार विद्यार्थी गणिताचे शिक्षण घेत असल्याचेही त्याने सांगितले. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यावर त्यांची एक परीक्षा घेतली जाते, त्यावरून या विद्यार्थ्यांला नेमके कशा पद्धतीने गणित शिकविले गेले पाहिजे याचे आकलन करून त्या विद्यार्थ्यांला त्या पद्धतीने शिक्षण दिले जाते. शिक्षण सुरू असताना त्यांची परीक्षाही घेतली जाते.

गुंतवणूक व उत्पन्नस्रोत

व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीच्या काळात मननने युनायटेड सीडकडून काही प्रमाणात गुंतवणूक उभी केली. यानंतर दुसऱ्या फेरीत गुगलनेही कंपनीला निधी उपलब्ध करून दिला आहे. या कंपनीत शिक्षक म्हणून सहभाग घेतल्यावर त्या शिकवणी शुल्कातील ६० टक्के रक्कम ही शिक्षकाला जाते, तर ४० टक्के रक्कम कंपनीला जाते. यातून मिळणारा निधी हेच कंपनीचे मुख्य उत्पन्नस्रोत असल्याचे मननने सांगितले.

नवउद्यमींना सल्ला

ग्राहकाची खरी गरज काय आहे हे जाणून घ्या. यानंतरच तुमचा विचार प्रत्यक्षात आणा, असा महत्त्वपूर्ण सल्ला मननने नवउद्यमींना दिला आहे. याचबरोबर तुम्ही व्यवसायाचे जे काही नियोजन करतात ते नियोजन अचूक असले पाहिजे. तसेच आपला व्यवसाय हा नफा कमाविणारा असला पाहिजे. नवउद्योग सुरू करताना या बाबींची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही मननने नमूद केले.

नीरज पंडित @nirajcpandit

niraj.pandit@expressindia.com