24 February 2021

News Flash

माथेरान सुशोभीकरणाचे ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण

‘या ठिकाणी असलेल्या पर्यावरणीय बंधनांमुळे हे काम करताना सर्व काळजी घेतली जात आहे.

मुंबई : माथेरान या निसर्गरम्य पर्यटनस्थळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) सुरू असलेले सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर असून हे काम ५० टक्कय़ांहून अधिक पूर्ण झाले आहे.

माथेरान हे पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील असल्याने २०१७ साली स्थापलेल्या माथेरान देखभाल समितीने दिलेल्या सूचनांचे पालन करत केले जात असल्याचे एमएमआरडीएने सांगितले. या कामामध्ये पॅनोरमा पाइंट, हार्ट पॉइंट, मियरा पॉइंट आणि इको पॉइंट ही पर्यटनदृष्टय़ा महत्त्वाची ठिकाणे, दस्तुरी-माथेरान रस्ता आणि पर्यटकांसाठी असलेला वाहनतळ सुधारणांच्या कामाचा समावेश आहे.

आत्तापर्यंत चार निरीक्षण स्थानांचे सुशोभीकरण आणि सुधारणेचे काम ७० टक्के  पूर्ण झाल्याचे एमएमआरडीएने सांगितले. या कामाची सुरुवात एप्रिल २०१८ ला झाली. तर सप्टेंबर २०१९ ला सुरू केलेले दस्तुरी-माथेरान रस्त्याचे ३५ टक्के  सुशोभीकरण पूर्ण झाले असून दस्तुरी वाहनतळाच्या सुधारणांचे नव्वद टक्के  काम पूर्ण झाले आहे.

‘या ठिकाणी असलेल्या पर्यावरणीय बंधनांमुळे हे काम करताना सर्व काळजी घेतली जात आहे. जेव्हा हे सुशोभीकरण आणि रस्त्याच्या सुधारणांचे काम पूर्ण होईल, तेव्हा पर्यटक येथील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद अधिक आरामदायीपणे घेऊ शकतील,’ असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले. या कामाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी नुकतीच माथेरानला भेट दिली.

परिसंवेदनशील क्षेत्र घोषित केले असल्याने माथेरानला रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे वाहन यांखेरीज अन्य वाहनांना दस्तुरी नाक्यापुढे परवानगी नाही. दस्तुरी नाक्यापासून पुढील ५.६० किलोमीटर लांबीचा रस्ता कच्चा असल्याने चालण्यास, घोडय़ांसाठी तसेच सामान भरलेल्या गाडय़ा ओढणे कठीण होते.

या रस्त्याच्या टिकाऊपणासाठी जांभ्या मातीच्या विटांचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी चिपळूण येथील कारखान्यात आणि प्रयोगशाळेत प्रयोग करून एमएमआरडीएने आयआयटी मुंबई यांच्या परवानगीने मानके निश्चित केली आहेत.

त्यानुसार जांभ्या मातीच्या विटांची मजबुती एम-४० काँक्रीट पेव्हर ब्लॉक्सच्या इतकी असेल. या विटा केवळ जांभी माती, भुगा, निर्वातीकरण पद्धतीने बाहेर काढून आणि ९०० ते १००० डिग्री तापमानात भाजून अन्य काही न मिसळता तयार करण्यात आल्या.

याशिवाय रस्त्यावरचे दिवे, सूचनाफलक, वाटसरूंना बसण्यासाठी बाक, घोडय़ावर चढण्यासाठी केलेल्या पायऱ्या, कचराकुंडय़ा, दिव्यांचे खांब, सुरक्षाकठडे या बाबी माथेरान देखभाल समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि माथेरान वारसा समितीच्या नियमावलीनुसार करण्यात येतील.  वाहनांना प्रवेशबंदी असलेल्या दस्तुरी प्रवेशद्वाराजवळील वाहनतळाची सुधारणा सिमेंट काँक्रीटचे पेव्हर ब्लॉक लावून करण्यात येईल. पाण्याचा निचरा होण्यासाठी स्टॉर्म वॉटर पद्धतीचा वापर केला जाईल. वाहनतळावर पर्यटकांची वाहने शिस्तीने उभी राहावीत म्हणून साखळीचे कुंपण घालण्यात येईल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 12:45 am

Web Title: matheran beautification work complete more than 50 percent zws 70
Next Stories
1 २ लाखांहून अधिक करोनामुक्त
2 चाचण्यांतील पळवाटांमुळे उपचारांचा नवा तिढा
3 ‘रिपब्लिक’च्या कार्यकारी संपादकाची चौकशी
Just Now!
X