मध्य रेल्वे प्रशासनाची ग्वाही; इंजिन, डबे, रेल्वेमार्ग यांची कामे सुरु

डोंगरदऱ्यांच्या कुशीतून, ढगांशी खेळत आणि ‘पळत्या झाडांशी’ शर्यत लावत नेरळहून माथेरानचा डोंगरमाथा गाठणारी ‘माथेरानची राणी’ बंद करण्याचा रेल्वेचा कोणताही विचार नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. या गाडीची दोन इंजिने नेरळ येथून क्रेनच्या साहाय्याने ट्रकमध्ये टाकून नेल्यानंतर तर्कवितर्काना उधाण आले होते. या शंकाकुशंकांना पूर्णविराम देत मध्य रेल्वेने ही इंजिने अद्ययावत करण्यासाठी दार्जिलिंग येथे पाठवली असल्याचे सांगितले. पावसाळ्यादरम्यान डब्यांमध्ये हवेच्या दाबावर चालणारे ब्रेक बसवण्याचे काम सुरू आहे. तर पावसाळ्यानंतर सुरक्षेसाठी आवश्यक कामे झाल्यानंतर ही गाडी सुरू होणार आहे.

मे महिन्यात एकाच आठवडय़ात दोन वेळा ‘माथेरानची राणी’ रुळांवरून घसरली होती. सुदैवाने या दोन्ही अपघातांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, पण या गाडीची ब्रेकप्रणाली जुनाट असल्याचे लक्षात आले होते. तसेच या मार्गावर अनेक ठिकाणी गाडीच्या परिचालनाला धोका असल्याचे लक्षात आल्यावर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ही गाडी चालवण्याची परवानगी नाकारत ही गाडी नेरळ ते अमन लॉज बंद ठेवली होती. मंगळवारी नेरळ येथे उभी असलेली या गाडीची दोन इंजिने क्रेनच्या साहाय्याने उचलून एका मोठय़ा ट्रकवर ठेवण्यात आली आणि तर्कवितर्काना उधाण आले. ही इंजिने दार्जिलिंगला नेण्यात येत असून माथेरानची छोटी गाडी कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याचे वृत्तही पसरले. याबाबत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांना विचारले असता त्यांनी या वृत्तात काहीच तथ्य नसल्याचे सांगितले. ही इंजिने दार्जिलिंगला जात आहेत. मात्र, याआधीही दोन इंजिने तेथील कार्यशाळेत नेली होती. त्या इंजिनांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान जोडून ती पुन्हा माथेरानला आणली आहेत. आता उर्वरित दोन इंजिनांचे काम करण्यासाठी ती नेण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले.

प्रवास सुरक्षित करण्याचा प्रयत्न

इंजिनांप्रमाणेच या गाडीच्या डब्यांमध्येही हवेच्या दाबावर चालणारे ब्रेक बसवण्यात येणार आहेत. त्याशिवाय रुळांमध्येही काही अडचणी आहेत. त्या दूर करून नेरळ-माथेरान प्रवास सुरक्षित करण्यासाठी पावसाळ्यानंतर कामे घेण्यात येतील. ही कामे पूर्ण झाल्यावरच ही सेवा सुरू होणार आहे. रेल्वेला ही सेवा बंद पडू द्यायची नाही, म्हणूनच सर्व कामे हाती घेतल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.