गेल्या वर्षीच्या तुलनेत तिकीट विक्रीत २७ लाख रुपयांनी वाढ
पर्यटकांचा आकर्षणबिंदू असलेली नेरळ-माथेरानची मिनी ट्रेन एकाच आठवडय़ात दोन वेळा रूळावरून घसरल्यामुळे अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असला, तरी हा निर्णय अन्यायकारक असल्याची माथेरानकरांची भावना आहे. माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचा आणि स्थानिक रहिवाशांचा या गाडीला मिळणारा प्रतिसाद वाढत असूनही रेल्वेने ही गाडी बंद केली आहे.
इतकेच नाही, तर गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत २०१५-१६ या आर्थिक वर्षांत या छोटय़ा गाडीला २७ लाख रुपयांचा जादा महसूल मिळाला असूनही ही गाडी बंद केल्याने माथेरानकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
वाहने पोहोचू न शकणाऱ्या थंड हवेच्या खूप कमी ठिकाणांमध्ये माथेरानची गणना होते. त्यामुळे नेरळपासून गावापर्यंत थेट जाणारी रेल्वे हे पर्यटकांपासून ते गावकरी, आसपासचे आदिवासी यांच्याही सोयीचे माध्यम आहे. ही गाडी चालवण्यासाठी रेल्वेला २० कोटी रुपयांचा वार्षिक तोटा सहन करावा लागत असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेऊन ही गाडी चालवावी, असाही सल्ला देतात.
प्रत्यक्षात ही गाडी चालू ठेवण्यासाठी २००९मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रेल्वेला १० कोटी रुपयांची मदत केली होती. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानेही ५० लाख रुपये याआधी रेल्वेला दिले होते, अशी माहिती माथेरान नगरपरिषदेचे तत्कालिन नगराध्यक्ष आणि सध्याचे विरोधी पक्षनेते मनोज खेडकर यांनी दिली. त्यामुळे रेल्वेने नफ्यातोटय़ाची गोष्ट या गाडीच्या बाबतीत करूच नये, असेही खेडकर यांनी सांगितले.
आकडेवारीवर नजर टाकली असता, रेल्वेच्या या दाव्यात पूर्ण तथ्य नसल्याचे दिसून येते. २०१४-१५ या वर्षांत ४.५७ लाख तिकीट विक्रीतून २.९५ कोटी रुपयांचे उत्पन्न या छोटय़ा गाडीने रेल्वेला मिळवून दिले होते. तर या वर्षांत ५.१८ लाख प्रवाशांनी या गाडीतून प्रवास करण्याचा आनंद लुटला. तर, २०१५-१६ या वर्षभरात या मार्गावर ४.३९ लाख तिकिटे विकली गेली. म्हणजे तब्बल १८ हजार तिकिटे कमी विकली गेली. तरीही या वर्षांत रेल्वेने ३.२२ कोटी रुपये म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ लाख रुपये जास्त कमावले. या वर्षभरात ५.४६ लाख लोकांनी या गाडीने प्रवास करणे पसंत केले.

Untitled-23