कधी सुरू होणार हे सांगणे कठीण; मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची माहिती

पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या माथेरान येथे चालवली जाणारी ‘मिनी ट्रेन’ वर्ष भरात दोन वेळा रुळावरून घसरल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून ही ट्रेन बंद ठेवण्यात आहे. मात्र ही ट्रेन केव्हा सुरू होईल याची अनिश्चितता असल्याने ही माथेरानची राणी केव्हा धावेल की नाही याबाबत अनेकांमध्ये शंका उपस्थित झाली आहे.

ट्रेन सुरू करण्यापूर्वी सर्व सुरक्षा उपाय योजना, डब्यांमधील रचना, संरक्षक भिंत बांधण्याचे नियोजन आहे. यातील संरक्षक िभतीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून ट्रेन सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण ती कधी सुरू होईल हे सांगता येणे कठीण आहे असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अखिलेश अग्रवाल यांनी सांगितले.

या वर्षी मिनी ट्रेन रुळावरून घसरण्याच्या सलग दोन घटना एप्रिल महिन्याच्या अखेरीस आणि मे महिन्याच्या सुरुवातीला घडल्या होत्या. त्यामुळे रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार सुरक्षा उपाय योजण्यासाठी चार सदस्यांच्या एका स्वतंत्र समितीचीही स्थापना करण्यात आली होती. या समितीकडून अहवाल सादर करण्यात आले आहेत. अहवालातून मिनी ट्रेनमध्ये सुधारणा करण्याबरोबरच प्रवाशांसाठी सुरक्षेचे उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. समितीने सादर केलेल्या अहवालात ट्रेनला एअर ब्रेक बसविण्यात येणार असून घाटात ६५० मीटरची िभतही बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ट्रेन केव्हा सुरू होणार यावर कोणताही ठोस असा निर्णय झाला नाही. रेल्वेकडून मध्यंतरी मिनी ट्रेन बंद केली जाणार नाही असे स्पष्टही करण्यात आले होते.

मिनी ट्रेनचे डबे रुळावरून घसरण्याच्या दोन घटना घडल्यानंतरही माथेरान ते अमन लॉज अशी शटल सेवा सुरू ठेवण्यात आली. मात्र त्यात काही तांत्रिक अडचण येत असल्याने पावसाळ्यापूर्वी ती सेवाही बंद केली.

मिनी ट्रेनची संपूर्ण सेवा पावसाळ्यात बंद ठेवली जाते आणि साधारपणे १५ ऑक्टोबर किंवा त्यानंतर सेवा सुरू केली जाते. मात्र आता संपूर्ण सेवा पर्यटकांसाठी सुरू होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होतानाच दुसरीकडे शटल सेवा सुरू करण्यावरही काही अधिकाऱ्यांकडून मत व्यक्त केले जात आहे.