21 November 2017

News Flash

वीजनिर्मितीचे गणित फसले;भारनियमनमुक्तीचे फासे उलटले!

महाराष्ट्र भारनियमनमुक्त करण्यासाठी केलेल्या विजेच्या नियोजनानुसार डिसेंबर २०१२ पर्यंत ‘महानिर्मिती’ आणि खासगी वीजकंपन्यांकडून अपेक्षित

स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ मुंबई | Updated: December 16, 2012 2:23 AM

महाराष्ट्र भारनियमनमुक्त करण्यासाठी केलेल्या विजेच्या नियोजनानुसार डिसेंबर २०१२ पर्यंत ‘महानिर्मिती’ आणि खासगी वीजकंपन्यांकडून अपेक्षित असलेल्या एकूण ३७५५ मेगावॉट विजेपैकी सुमारे तीन हजार मेगावॉट वीज राज्याला विविध कारणांनी मिळू शकली नाही आणि त्यातूनच भारनियमनमुक्तीच्या निर्णयाचे फासे उलटे फिरले.
‘महानिर्मिती’च्या खापरखेडा आणि भुसावळ येथील प्रत्येकी ५०० मेगावॉटच्या संचांमधून डिसेंबर २०११ आणि मार्च २०१२ मध्ये पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होऊन उपलब्धता एक हजार मेगावॉटने वाढेल, तर ‘महानिर्मिती’च्या भुसावळ वीजप्रकल्पातील आणखी एक ५०० मेगावॉटचा संच मे २०१२ मध्ये कार्यान्वित होईल, असे नियोजन होते. पण भुसावळचा हा मे महिन्यात अपेक्षित असलेला संच अद्यापही व्यावसायिकदृष्टय़ा कार्यरत झालेला नाही. त्यामुळे ‘महानिर्मिती’कडून १५०० पैकी जेमतेम सुमारे ८०० मेगावॉट वीज मिळते, पण इंधनाच्या प्रश्नामुळे त्यातही सातत्य नाही.
तर खासगी वीजप्रकल्पांतून २२५५ मेगावॉट वीज मिळेल असे नियोजन होते. त्यात ‘अदानी पॉवर’कडून मे २०१२ ते नोव्हेंबर २०१२ या काळात १४४५ मेगावॉट तर ‘इंडिया बुल्स’च्या अमरावतीमधील प्रकल्पातून ऑगस्ट २०१२ ते डिसेंबर २०१२ या काळात टप्प्याटप्प्याने ८१० मेगावॉट वीज मिळेल, अशी ‘महावितरण’ची योजना होती. पण तिचा पूर्णपणे बोऱ्या वाजला. खासगी क्षेत्राची वीज सरकारी कंपनीपेक्षाही बेभरवाशाची ठरली. अशा रीतीने डिसेंबरच्या भारनियमनमुक्तीसाठी गृहीत धरलेल्या ३७५५ मेगावॉट विजेपैकी सुमारे तीन हजार मेगावॉट वीज राज्याला मिळालीच नाही आणि विजेच्या उपलब्धतेचे समीकरण फसले.
वीजचोऱ्या आणि वीजदेयक थकबाकीमुळे सुमारे २५ टक्के महाराष्ट्रात भारनियमन सुरू आहे. हे धोरणात्मक असल्याचा ‘महावितरण’चा पवित्रा आहे. सध्या सुमारे एक हजार मेगावॉटची तूट आहे. रात्रीच्या वेळी जादा वीज असल्याने ती बाहेर विकण्यापेक्षा उद्योगांना सवलतीच्या दरात द्यावी, अशी ‘महावितरण’ची वीज आयोगाकडे मागणी आहे. त्यामुळे ही तीन हजार मेगावॉट वीज मिळाली असती तर ‘महावितरण’ने भारनियमनाबाबत काय भूमिका घेतली असती हा प्रश्न उपस्थित होतो.     

कोळसाटंचाईने ‘महानिर्मिती’ हैराण
राज्याची वीजनिर्मिती कंपनी असलेली ‘महानिर्मिती’ कोळसाटंचाईने हैराण आहे. पारस वगळता राज्याच्या एकाही वीजप्रकल्पात पाच दिवस पुरेल इतकाही कोळसा नाही. विशेष म्हणजे देशाच्या इतर राज्यांना बऱ्यापैकी कोळसापुरवठा होत आहे. ‘महानिर्मिती’ची औष्णिक वीजनिर्मिती क्षमता ७४८० मेगावॉट आहे. पण त्यातून सुमारे ४८०० मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. परळीत पाण्याची अडचण तर नाशिक, भुसावळ, कोराडी, चंद्रपूर आदी वीजप्रकल्पांत एक ते तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये ‘महावितरण’ला पाच हजार मेगावॉट वीज कबुल करण्याची वेळ ‘महानिर्मिती’वर आली. त्यापैकी ४८०० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू आहे. पण भुसावळचा ५०० मेगावॉटचा संच व्यावसायिकदृष्टय़ा कार्यरत होणे प्रलंबित होत आहे.

First Published on December 16, 2012 2:23 am

Web Title: maths goes wrong on to produce electrisity