28 November 2020

News Flash

कांदळवन प्रतिष्ठानच्या मत्स्यशेती उपक्रमास दुप्पट प्रतिसाद

कांदळवन प्रतिष्ठानमार्फत (मॅन्ग्रूव्ह फाऊंडेशन) सुरू केलेल्या मत्स्यशेती उपक्रमास या वर्षी दुप्पट प्रतिसाद मिळाला आहे.

जिताडा पालनाची नवीन ३१, तर खेकडा पालनाची २६ केंद्रे कार्यरत

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : कांदळवन प्रतिष्ठानमार्फत (मॅन्ग्रूव्ह फाऊंडेशन) सुरू केलेल्या मत्स्यशेती उपक्रमास या वर्षी दुप्पट प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षांपर्यंत केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कार्यरत असलेल्या या उपक्रमाचा विस्तार किनारपट्टीवरील इतर जिल्ह्य़ातही झाला असून मत्स्यशेती केंद्रांची संख्या दुप्पटीपेक्षा अधिक झाली आहे.

सागरी जैवविविधता आणि कांदळवनांचे जतन, संरक्षण व्हावे यादृष्टीने २०१६ पासून खाडीक्षेत्रात ‘कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण’ या योजनेंतर्गत मत्स्यशेतीचे विविध उपक्रम कांदळवन प्रतिष्ठानने हाती घेतले. वनविभागाच्या अखत्यारीतील कांदळवन कक्षाच्या अंतर्गत कांदळवन प्रतिष्ठान काम करते. या वर्षी जिताडा पालनाची नवीन ३१ केंद्रे, तर खेकडा पालनाची नवीन २६ केंद्रे कार्यरत होत असल्याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे उपजीविका विकास विभागाचे उपसंचालक डॉ. सुशांत सनये यांनी दिली. परिणामी किनारपट्टीवर जिताडा पालनाची एकू ण ६६ आणि खेकडा पालनाची २९ केंद्रे नोव्हेंबर अखेपर्यंत कार्यरत होतील. यामध्ये सर्वाधिक सहभाग हा सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.  टाळेबंदीत काहीच उत्पन्न नसताना मत्स्यशेतीतील उत्पन्नाचा सकारात्मक परिणाम या वर्षी कें द्रांची संख्या वाढण्यामागे दिसून येत असल्याचे कांदळवन कक्षाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी सांगितले.

किनारपट्टीवरील कांदळवने असलेल्या गावांमध्ये ‘कांदळवन सहव्यवस्थापन समिती’ स्थापन केली जाते. सध्या किनारपट्टीवर अशा १०९ समिती कार्यरत आहेत. या समितीच्या माध्यमातून अल्प बचत गटांना मत्स्यशेतीसाठी प्रोत्साहित केले जाते. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसत असून कांदळवन तोडीस आळा बसणे, तसेच ही तोड रोखण्यासाठी हे बचतगट पुढाकार घेत असल्याचे डॉ. सनये यांनी सांगितले.

ऐन टाळेबंदीत २७ लाखांची उलाढाल

या वर्षी करोना आणि टाळेबंदीमुळे अनेक व्यवसायांना फटका बसला. मात्र मे ते जुलैदरम्यान या उपक्रमातील मत्स्यशेतीची २७ लाखांची उलाढाल झाली. यामध्ये जिताडा मासे विक्रीचा मोठा वाटा असून त्याचबरोबर खेकडे, शोभिवंत मासे आहेत. या उपक्रमातून १०९ गावांतील तीन हजार जणांना फायदा मिळत असल्याचे कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मत्स्यशेती अशी होते?

  • सुरुवातीला पायाभूत सुविधासाठी कांदळवन प्रतिष्ठानतर्फे ९० टक्के  निधी दिला जातो.
  • मत्स्यशेती खाडीमध्ये पिंजऱ्यांत केली जाते. पिंजरे उभारणी, शेतीसाठीचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण कांदळवन प्रतिष्ठानतर्फे दिले जाते.
  • पावसाळा संपला की ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नवीन मत्स्यबीज या पिंजऱ्यात सोडले जाते.
  • माशांच्या योग्य वाढीसाठी सुमारे आठ ते नऊ महिने अपेक्षित असतात. मे ते जुलै या काळात या केंद्रातील मासे पकडले जातात आणि विक्री होते.
  • खेकडय़ांसाठी कांदळवनांमध्येच कुंपण घातले जाते. कोळंबी पालनासाठी कांदळवन तोडावे लागत असल्याने त्यास प्रोत्साहन दिले जात नाही.
  • शेतीस सुरुवात केल्यानंतर तीन वर्षे प्रतिष्ठानतर्फे साहाय्य पुरवले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 2:26 am

Web Title: matsyasheti dd70
Next Stories
1 मुंबईत करोना रुग्ण संख्येत वाढ
2 टीआरपी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल
3 पुस्तकपाळांची अर्थकोंडी
Just Now!
X